पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाचा अवतार, कंगना रणौतच्या विधानावर रामदास आठवले म्हणाले…
कंगना राणौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'अवतार' म्हटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आठवले यांनी कंगनाच्या दाव्याशी असहमती दर्शवली, परंतु मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील खासदार कंगना रणौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक मोठे विधान केले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य मानव नसून अवतार आहेत. २०१४ पर्यंत मी मतदानालाही गेले नव्हते. मला नेत्यांबद्दल द्वेष होता, पण आता लोक चांगले काम सोडून राजकारणात आले आहेत. कारण आता नरेंद्र मोदींच्या रूपाने एक चांगला नेता आपल्याकडे आहे. या आधी सगळे खात होते आणि देशाची नासधूस करत होते”, असे विधान कंगना रणौत यांनी केले आहे. आता कंगना रणौतच्या या विधानावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर आपले मत व्यक्त केले. रामदास तडस यांना राम मंदिरात प्रवेश नाकारल्यासह, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना कंगना रणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर विचारणा करण्यात आली. त्यावरही त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली.
“मी सहमत नाही”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार आहेत असे मला वाटत नाही, ते माणसाचेच अवतार आहेत. जगभरातील पंतप्रधानांच्या सभेत ८० टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पसंती दिली. ते अतिशय मजबूत पंतप्रधान आहेत आणि जगातील लोकप्रिय नेते म्हणून त्यांचे नाव आहे. मात्र, ते देवाचा अवतार आहेत या मताशी मी सहमत नाही”, असे रामदास आठवले म्हणाले.
नरेंद्र मोदी यांचे वय झाले असले तरी ते अजूनही कणखर
“पंतप्रधान नरेंद्र मोदी चौथ्यांदा पंतप्रधान होतील का याबद्दल त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले, विरोधकांकडे केवळ वाद उभे करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही. नरेंद्र मोदी यांचे वय झाले असले तरी ते अजूनही कणखर आहेत आणि २०२९ मध्ये तेच पंतप्रधान बनतील, अशी माझी अपेक्षा आहे. विरोधकांची ताकद क्षीण झाली आहे. या पाच वर्षात आम्ही चांगले काम करणार आहोत, त्यामुळे जनता पुन्हा आम्हाला सत्तेत आणेल. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठीची भूमिका योग्य, पण दादागिरी योग्य नाही
“राज ठाकरे आमचे मित्र आहेत आणि लोकसभेत ते आमच्यासोबत होते, पण त्याचा आम्हाला फायदा झाला नाही. विधानसभेत ते सोबत नव्हते. राज ठाकरे यांच्या मराठीच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत, पण दबाव आणून मराठी बोलण्याची भूमिका योग्य नाही. मुंबई ही आर्थिक राजधानी असून येथे सर्व राज्यांतील लोक राहतात. त्यामुळे सर्वच बोर्ड मराठीत असले तर परदेशी लोकांना वाचायला अडचण येईल, इंग्रजीमध्येही बोर्ड असावेत. मराठीची भूमिका योग्य आहे, पण दादागिरी करणे योग्य नाही, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. बँकेतील व्यवहार मराठीतून करावे या मताशीही मी असहमत आहे. सरकारने यासंदर्भात निर्णय घ्यावा आणि राज ठाकरेंची दादागिरीची भाषा थांबायला हवी”, असे रामदास आठवले म्हणाले.