मराठी नेत्याकडूनच ‘जय कर्नाटका’ म्हणून कन्नडिगांचा जयघोष; सीमाबांधवांच्या भावनांशी खेळ…
काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी महाराष्ट्रातून येऊन कर्नाटकचा जयघोष घातल्याने त्यांच्यावर आता कर्नाटकातील मराठी भाषिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
बेळगावः राज्यातील राजकारण वेगवेगळ्या कारणांनी ढवळून निघाले असतानाच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख बेळगाव दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जय बेळगाव आणि जय कर्नाटका म्हणत सीमाभागातील मराठी बांधवांच्या भावना दुखवण्याचं काम त्यांनी केल्याची टीका आता बेळगावमधील मराठी भाषिकांनी केली आहे. आमदार धीरज देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्र कर्नाटक वाद हा पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके यांनीही त्यांच्यावर टीका करताना महाराष्ट्रातील नेत्यांनी आता पुन्हा कर्नाटकात येताना तुम्ही पक्षाच्या सूचना पाळणार की मराठी माणसांच्या भावना दुखवण्याचं काम करणार असा इशारा देत बेळगावमध्ये येताना याचा विचार करा असा सल्ला त्यांनी धीरज देशमुख यांना दिला आहे.
काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख एका कार्यक्रमासाठी बेळगाव दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी जय बेळगाव म्हणत त्यांनी जय कर्नाटका म्हणत कर्नाटक राज्याचा जयघोष घातला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून कर्नाटक सरकारकडून बेळगाव आणि परिसरातील मराठी भाषिकांवर अन्याय चालू असतानाही आणि त्यांना न्याय न देणाऱ्या कर्नाटक सरकारचाच जयघोष आमदार धीरज देशमुख यांनी घातला आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे कर्नाटकातील मराठी भाषिक नाराज झाल्याची टीका करण्यात येत आहे.
काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी महाराष्ट्रातून येऊन कर्नाटकचा जयघोष घातल्याने त्यांच्यावर आता कर्नाटकातील मराठी भाषिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सीमालढ्याला दिलेल्या योगदानावर पाणी फेरण्याचे काम धीरज देशमुख यांनी केल्याची टीका शुभम शेळके यांनी केली आहे.