कर्नाटक सरकारचा पुन्हा आडमुठेपणा, महाराष्ट्रातील प्रवाशांना परिस्थिती पाहून झाले अश्रू अनावर
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसू लागला आहे. कर्नाटक सरकारने बस सेवा बंद केल्याने दोन्ही बाजूची बससेवा ठप्प झाली आहे.
साईनाथ जाधव, कर्नाटक : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमा वाद पुन्हा उफाळून आला आहे. कर्नाटक सरकारकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. मंगळवारी देखील कर्नाटक मध्ये महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड झाली होती, त्यांची अडवणूक तेथील नागरिकांकडून केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातूनही कर्नाटकच्या वाहनांना अडवून काळे फासले जात होते. त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. असे असतांना आजच्या दिवशी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये राज्य परिवहन विभागाच्या काही बसेस सोडण्यात आल्या होत्या. मात्र त्या बस परतल्याच नाही. कर्नाटक सरकारच्या पोलीसांनी आणि परिवहन विभागाने त्या बसेस बस स्थानकाच्या आगारातच रोखून धरल्या आहे. कर्नाटक सरकारने ही आडमुठे भूमिका घेतल्यानंतर प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. काही प्रवाशांना तर अक्षरशः रडू कोसळले आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसू लागला आहे. कर्नाटक सरकारने बस सेवा बंद केल्याने दोन्ही बाजूची बससेवा ठप्प झाली आहे.
कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील अनेक नागरिक आणि भाविक अडकून आहेत, त्यांना महाराष्ट्रात येण्यासाठी बससेवा हाच एक मार्ग शिल्लक राहिला होता.
दोन्ही बाजूची बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे घरी कसं परतायचे असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिल्याने काही प्रवाशांना अश्रू अनावर झाले होते.
कर्नाटक पोलीसांनी आणि परिवहन विभागाने कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या बस रोखून धरल्या आहे, त्यामुळे ही आडमुठे भूमिका कर्नाटक सरकार घेत असल्याचे दिसून येत आहे.
कर्नाटकच्या दिशेने निघालेल्या बसही पुन्हा महाराष्ट्रात परतू लागल्या असून बससेवा दोन्ही बाजूने ठप्प झाली असल्याने हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.