मुंबई : आज महाराष्ट्रात ज्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत, त्याचा सध्या दिल्लीतही बोलबाला आहे. कारण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात दाखल होत आधी उद्धव ठाकरेंची (Cm Uddhav Thackeray) भेट घेतली. त्यानंतर केसीआर (Kcr) थेट महाराष्ट्राचे राजकारण जिथून हालतं त्या सिलव्हर ओकवर पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला पोहोचले. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर देशाच्या परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रातून होत असल्याचे राव यांनी सांगितले तर पवारांच्या भेटीनंतरही त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. देशात भाजपला टक्कर देण्यासाठी आता बारामती हब बनणार असे एकदरीत चित्र निर्माण झाले आहे, कारण राव यांनी लवकरच सर्व राजकीय पक्षांची मोट बांधून बारामतीत भेटणार असल्याचे सांगितले आहे. या भेटीनंतर या आघाडीचा अजेंडा देशासमोर ठेवण्यात येईल असेही राव म्हणाले. त्यामुळे भाजपविरोधात लढण्याचा प्लॅन बारामतीत तयार होणार एवढं मात्र नक्की झालंय.
पुढचा प्लॅन बारामतीत ठरणार-केसीआर
पवारांनी तेलंगना राज्य बनवण्यास मदत केली ती कधीच विसरू शकत नाही. पवार आमचे वरिष्ठ नेते आहेत. हा देश नीट चालत नाही, आम्ही पवारांचा सल्ला घ्यायला आलोय. देशाचा विकास होत नाहीये, असे राव म्हणाले आहेत. तर पवारांचा राजकारणाचा अनुभव मोठा आहे. पवारांच्या अनुभवांचा फायदा होईल. पवारांनी मला आशीर्वाद दिला आहे. एकत्र येण्यावर आमची सहमती झाली आहे. इतर पक्षांनाही एकत्र आणणार तेव्हा सर्व लोक बारामतीत भेटतील आणि चर्चा करतील. त्यानंतर लवकरच देशाच्या समोर नवा अजेंडा ठेवणार असल्याचेही राव यांनी सांगितलं आहे. त्यामुळे भाजपविरोधात महाराष्ट्रातून वातावरण तापताना दिसतंय.
भेटीनंतर पवार काय म्हणाले?
तर राव यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत बोलताना पवार म्हणाले, आजची मिटिंग वेगळ्या मुद्द्यावर होती. देशातल्या बिकट परिस्थिवर चर्चा झाली. राजकीय चर्चा जास्त केली नाही, लोकांच्या अडचणींवर जास्त चर्चा होणं गरजेचं होतं.तसेच तेलंगणाने देशाला एक रस्ता दाखवला आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी चांगलं काम केलं आहे, असे म्हणत त्यांनी तेलंगणाचे कौतुक केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून रोखणारे पवार देशात भाजपला रोखण्यात यशस्वी होणार का? हे आगामी काळच सांगेल. मात्र देशात एक नवी आघाडी भाजपविरोधात एकवटत असल्याचे तरी सध्या दिसून येत आहे. या भेटीनंतर सुडाच्या राजकारणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भाजपवर तोफा डागल्या आहेत.