Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरण; आरोपीचा एन्काऊंटर करणाऱ्याला 51 लाखांचे बक्षीस, शेतकऱ्याच्या घोषणेने एकच खळबळ
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत असून त्यामुळे वातावरण तापलं आहे. याप्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. दरम्यान देशमुख यांच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अनेक दिवस उलटले असले तरी हे प्रकरण अद्याप तापलेलंच आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला आहे. संतोष देशमुख यांना जबर मारहाण करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 9 डिसेंबर रोजी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची क्रूरपणे, निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण तापलं असून मुख्य आरोपीसह सर्वांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
याचप्रकरणात आता एक नवी अपडेट समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपीला जो फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवेल अथवा एन्काऊंटर करेल त्या अधिकाऱ्याला 51 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. शिवाय 5 एकर जमीन देण्यात येईल अशी अनोखी घोषणा करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर मुख्य सूत्रधारास लवकरात लवकर अटक करणाऱ्या अधिकाऱ्याला 2 लाख रुपये रोख देण्यात येतील असे बक्षीसही माढअयातील शेतकऱ्याने जाहीर केलं आहे.
माढ्याच्या शेतकऱ्याच्या घोषणेने एकच खळबळ
संतोष देशमुख यांच्या हत्येला 10 दिवस उलटून गेले तरी याप्रकरणातील मुख्य आरोपींना अद्याप अटक नाही. या मुद्यावरून फक्त बीडमध्ये नव्हे तर राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. पवनचक्कीत 2 कोटींच्या खंडणीच्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला. यामुळे राक्षसी कृत्याप्रमाणे संतोष देशमुखांचा जीव घेतला गेला असा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी सध्या आरोप-प्रत्यारोपांचेच राजकारण सुरू असताना सामान्य लोक मात्र न्यायाची मागणी करताना दिसत आहेत.
याचदरम्यान आता माढ्याच्या एका शेतकऱ्याने अनोख घोषणा केली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारास लवकरात लवकर अटक करेल, त्या अधिकाऱ्या 2 लाख रुपये रोख देण्यात येतील. तर मुख्य आरोपीचा एन्काऊंटर करेल अथवा त्याला फाशीपर्यंत पोहोचवेल , अशा पोलिस अधिकाऱ्यास 52 लाख रुपये, त्याशिवाय 5 एकर बागायत जमीन देण्याची अनोखी घोषणा माढ्यातील शेतकरी कल्याण बाबर यांनी केली. ते माढा तालुक्यातील वडशिंगे येथील राहणारे असून त्यांनी अशा आशयाचे लिहीलेले प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह पोलिस महासंचालक आदींना शेतकरी बाबर यांनी पाठवले आहे. मात्र यामुळे एकच खळबळ माजली आहे. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, तो सत्ताधाऱ्यांचा असो की विरोधकांचा. गुन्हेगाराची दहशत संपली पाहिजे, त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे, सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना बाबर यांनी व्यक्त केली.
पोस्टमॉर्टम अहवाल समोर
दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला असून त्यांना बर मारहाण झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. मारहाणीमुळे शरिरातून अतिरक्तस्त्राव झाला. शॉकमध्ये गेल्यामुळे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला, असा उल्लेख शवविच्छेदन अहवालात करण्यात आला . अद्याप या प्रकरणातील मुख्य आरोपीसह तीन जण फरार आहेत.