Pooja Khedkar : लाल दिव्यांबाबतचे नियम काय?; ट्रेनी IAS पूजा खेडकरच्या ऑडीचा वाद का वाढला?
आयएएस अधिकारी पूजा खेडकर या चांगल्याच वादात अडकल्या आहेत. त्यांच्यावर रोज नवे आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांची बदलीही करण्यात आली. पण त्यांच्यावरील आरोपांची मालिका काही थांबलेली नाही. त्यामुळे काही आरोपांच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. लाल दिव्याच्या गाडीपासून हा वाद सुरू झाला. त्यामुळे लाल दिव्याची गाडी कुणाला मिळते? लाल दिव्याबाबतचे काय आहेत नियम? त्यावर टाकलेला हा प्रकाश.
ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. पूजा खेडकर यांची चर्चा मुंबईपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे. अनेक आरोपांमुळे पूजा हा वादग्रस्त ठरल्या आहेत. पूजा यांनी बनावट कागदपत्र दिल्याने त्या आयएएस बनल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. एक सिंगल मेंबर कमिटी या प्रकरणाची चौकशी करणार आहे. हा वाद सुरू असतानाच पूजा यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे. ट्रेनी असूनही पूजा यांनी लालदिव्याच्या गाडीचा आग्रह धरला होता. लालदिव्याची कार देण्याचे काही सरकारी नियम आहेत. त्यावर टाकेलला हा प्रकाश.
मागण्यांमुळे चर्चेत
आएएस नियुक्तीनंतर ट्रेनी व्यक्तीला कलेक्टरच्या देखरेखीत ट्रेनिंग घ्यावी लागते. पूजालाही तेच करावं लागलं. पण त्यांनी जॉईनिंग करण्यापूर्वीच अनेक मागण्या सुरू केल्या. जॉईनिंग पूर्वीच त्यांनी कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर यांच्याकडे आपल्याला मिळणाऱ्या सुविधांची त्यांनी यादी मागितली. तसेच आपल्याला आपल्या आवडीचं कार्यालय द्यावं, सोबत अटॅच वॉश रुम असावा अशा त्यांनी मागण्या केल्या. या मागण्या पूर्ण होत नसल्याने त्यांनी ऑफिस जॉईनही केलं नव्हतं.
ऑडी कारची चर्चा
पूजा यांच्या ऑडी कारची सर्वाधिक चर्चा झाली. या कारवर त्यांनी लालदिवा लावला होता. तिथूनच हा वाद सुरू झाला. पुण्यात नियुक्तीवर असताना पूजा या लालदिवा लावलेल्या ऑडीने येत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा यांनी वापरलेली कार एका खासगी कंपनीने नोंदवलेली आहे. त्या गाडीचे चलान कापलेले आहेत. ऑडी कार संबंधित कथित उल्लंघनाबाबत मोटर वाहन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
नियम काय?
भारत सरकारने 2017 रोजी व्हिआयपी कल्चर बंद केलं होतं. त्यानुसार व्हिआयपींना त्यांच्या वाहनांवर लाल आणि निळा दिवा लावण्यासाठी परवानगी न देण्याचा निर्णय घेतला होता. 1 मे 2017 पासून कोणीही आपल्या वाहनांवर लाल आणि निळा दिवा लावणार नाही, पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही वाहनांवर लाल आणि निळा दिवा लावणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यासाठी सेंट्रल मोटर व्हेहिकल रुल 1989मध्ये बदल करण्यात आला होता.
भारतात लाल, पिवळा आणि निळा दिवा वाहनांवर लावण्यांचे नियम आहे. आता हे दिवे केवळ रुग्णवाहिका, फायर ब्रिगेडच्या गाड्या, पोलीस, लष्कर आणि एमर्जन्सी सेवांच्या वाहनांवरच लावले जातात. पूर्वी सेंट्रल मोटर व्हेहिकल्स रुल्स 1989 नुसार नियम 108 च्या कलम (III) अंतर्गत काही लोक ड्युटीवेळी हे दिवे लावू शकत होते. खासगी वाहनांवर त्याचा वापर करण्यात येत नव्हता. कोणत्या वाहनांवर लाल आणि निळा दिवा असावा हे राज्य आणि केंद्र सरकारलाही ठरवण्याचा अधिकार होता. मात्र, नव्या नियमानंतर अनेक राज्यांनी हे लाल बत्ती कल्चर बंद केलं आहे. आता केवळ एमर्जन्सी सेवांशी संबंधित वाहनांवरच हे दिवे लावले जातात.
किती प्रकारचे दिवे?
केवळ रंगाच्याशिवाय या दिव्यांचीही कॅटेगिरी असते. लाल दिवा फ्लॅशरसह, लाल दिवा फ्लॅशर शिवाय लावला जातो. तर पिवळा दिवाही फ्लॅशर शिवाय आणि फ्लॅशरसह लावण्याचे नियम आहेत.
कोण आहेत पूजा खेडकर?
पूजा खेडकर या 2023च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. पूजा या आधी सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यानंतर 2021मध्ये त्यांनी मल्टिपल डिसॅबिलिटी कॅटेगिरीत परीक्षा पास केली होती. त्यामुळे त्यांना त्यावेळी भारतीय क्रीडा प्राधिकरण सहाय्यक संचालक म्हणून पोस्टिंग मिळाली होती. त्यानंतर त्या आयएएस अधिकारी बनल्या. त्यांनी 2022मध्ये आयएएससाठी परीक्षा दिली होती. त्यावेळी त्यांना 821 वी रँक मिळाली होती. त्यांचे वडील दिलीप खेडकर वरिष्ठ सरकारी अधिकारी होते.