छगन भुजबळ वेगळा विचार करणार?; सुनील तटकरे काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मराठा आंदोलनाचा परिणाम झाला असल्याची कबुली सुनिल तटकरे यांनी दिली. आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आला आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्वच्छ आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच आमची भूमिका आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे पक्षात नाराज आहेत. त्यांना राज्यसभा न मिळाल्याने भुजबळ यांनी नाराजी जाहीर केली आहे. समता परिषदेनेही वेगळा निर्णय घेण्यासाठी छगन भुजबळ यांच्यावर दबाव टाकला आहे. त्यामुळे भुजबळ वेगळा निर्णय घेणार का याची चर्चाही सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत भुजबळ यांच्या नाराजीवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुजबळ नाराज नाहीत. ते पक्ष सोडून जाणार असल्याच्या केवळ अफवा आहेत. त्यात काही तथ्य नाही, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
सुनील तटकरे हे नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. छगन भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. छगन भुजबळ आणि पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीत छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत चर्चा होऊन त्यांचे निराकरण झाले. त्यानंतर राज्यसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना छगन भुजबळ यांनी आशीर्वादही दिले, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.
त्या फक्त अफवा
समता परिषदेच्या काल झालेल्या बैठकीत ओबीसी आरक्षण आणि जातीय जनगणना यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. त्या बैठकीत इतर विषय झाल्याचं माहीत नाही. पण छगन भुजबळ हे कोणताही वेगळा विचार करणार नाहीत. या चर्चा फक्त अफवा आहेत, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.
अजितदादांना बदनाम केलं जातंय
या लोकसभा निवडणुकीमध्ये संविधानाबद्दल केलेला अपप्रचार, अल्पसंख्यांक समाजाबद्दल असुरक्षितता निर्माण करण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यामुळे देशात आणि राज्यात एनडीए पिछाडीवर जाण्याच कारण ठरले आहेत, असंही ते म्हणाले. काही मतदारसंघात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आहेत. तरीही युतीचे उमेदवार पिछाडीवर आहेत. त्याबाबत आम्ही सविस्तर अहवाल पाहून विश्लेषण करू, अशी माहिती त्यांनी दिली. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी असलेल्या ठिकाणी भाजपच्या लोकप्रतिनिधींना आघाडी मिळाली आहे. मात्र अजितदादांना बदनाम करण्यासाठी हितशत्रूकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
निवडणुकीच्या तयारीसाठी दौरा
विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे पक्षाच्या सर्व फ्रंटच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दौरा सुरू केला आहे. त्यासाठीच मी आज नगरला आलो आहे. लोकसभा निवडणुकीत नगर विधानसभा मतदारसंघात मतांची आघाडी मिळाली. आज आम्ही पारनेर आणि कर्जत-जामखेडचा आढावा घेणार आहोत. लोकसभा निवडणुकीतील कामगिरी मिळालेली मतं, मतदारसंघांची परिस्थिती आणि निवडणुकीची तयारी कशी करायची? यासाठीचा हा दौरा आहे, असंही त्यांनी सांगितलं.