Nana Patole : ज्ञानव्यापी मशीद, हिजाब, हलालावर गोंधळ घालणारे बेरोजगारी महागाई, इंधनदरवाढीबाबत गप्प का?: नाना पटोलेंचा सवाल
देश सध्या एका कठीण परिस्थितीतून जात असताना मंदिर-मशिद, हिजाब, हलाला या मुद्द्यांना महत्व दिले जात असून ज्वलंत प्रश्नांकडे डोळेझाक करण्याच्या केंद्रातील भाजपा सरकारच्या भूमिकेत आहे. तर याची मोठी किंमत मात्र 130 कोटी जनतेला मोजावी लागत आहे, असेही पटोले म्हणाले.
मुंबई : देशात सध्या बेरोजगारी(Unemployment) , महागाईसारखे ज्वलंत प्रश्न असताना ज्ञानवापी मशीद, हलाल, झटका, हिजाब असे मुद्दे समोर केले जात आहेत हे दुर्दैवी आहे. केंद्र सरकारने हे प्रश्न सोडून जनतेला भेडसावत असलेल्या मुलभूत प्रश्नांवर लक्ष देऊन त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करावा याकामी विरोधीपक्ष म्हणून केंद्र सरकारला काही मदत हवी असेल तर ती देण्यास काँग्रेस पक्ष कधीही तयार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Pradesh Congress Committee Chairman Nana Patole) यांनी म्हटले आहे. यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, ज्ञानव्यापी मशिदीचा (Gyanvapi Masjid) मुद्दा, हिजाब, हलाला, झटका या मुद्द्यांमुळे देशातील बेरोजगारी, महागाई, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सुटत असतील तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. पण यामुळे जर देशाचे मानसिक विभाजन होत असेल, देशात गुंतवणूक येत नसेल, देशातील बेरोजगारी वाढत असेल आणि एक समाज दुसऱ्या समजासमोर जर उभा राहत असेल तर हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे. या गोष्टींचा आम्ही निषेध करतो.
महागाईचा दर 15.8 टक्क्यांपर्यंत
देशात महागाईचा आलेख हा वाढत असून एप्रिलमध्ये घाऊक महागाईचा दर 15.8 टक्क्यांपर्यंत गेला आहे. तो दहा वर्षांतील उच्चांक आहे. सलग तेरा महिन्यापासून महागाईचा दर वाढत आहे. अन्नधान्य, डाळी, गहू, खाद्यतेल, इंधन, गॅस, भाज्या यांचे दर सामान्यांना परवडणारे राहिले नाहीत. बेरोजगारीने 45 वर्षांतील उच्चांक केला आहे. सरकारी नोकऱ्या दिवसेंदिवस कमी होत असताना रेल्वेच्या 72 हजार नोकऱ्या संपवण्यात आल्या आहेत. देश सध्या एका कठीण परिस्थितीतून जात असताना मंदिर-मशिद, हिजाब, हलाला या मुद्द्यांना महत्व दिले जात असून ज्वलंत प्रश्नांकडे डोळेझाक करण्याच्या केंद्रातील भाजपा सरकारच्या भूमिकेत आहे. तर याची मोठी किंमत मात्र 130 कोटी जनतेला मोजावी लागत आहे, असेही पटोले म्हणाले.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधात आंदोलन
दरम्यान नाना पटोले यांनी पेट्रोल-डिझेलची जुलमी दरवाढ मागे घ्या अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन करू, असा इशारा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दिला होता. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पेट्रोल डिझेलवर भरमसाठ कर लादून जनतेचे खिसे कापत असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. तर या अन्यायी जुलमी, अत्याचारी दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून विरोध केल्याचे त्यांनी म्हटलं होतं. मोदी सरकारने ही जुलमी करवसुली कमी करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा भविष्यात काँग्रेस पक्ष यापेक्षा तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला होता.