विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात कोणत्या मतदारसंघातून कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. अशातच कोल्हापुरात मात्र बदलत्या राजकीय समीकरणांची चर्चा होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्याचा दौरा करत आहेत. नुकतंच त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातला भेट दिली. यावेळी कागल विधानसभा मतदारसंघामधून हसन मुश्रीफ निवडणूक लढवतील, असं जाहीर केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा तर होतच आहे, शिवाय महायुतीत मात्र धुसफूस वाढली आहे. जे नेते महायुतीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते त्यांच्यामध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.
कागलमध्ये कायमच राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे. 2019 ला भाजपने समरजित घाटगे यांना तिकीट नाकारलं होतं. मग त्यांनी अपक्ष निवडणूक लढली होती. पण 2019 ला त्यांना यश मिळालं नाही. हसन मुश्रीफ विजयी झाले होते. तेच समरजित घाटगे यंदा विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. भाजपकडून तिकिट मिळावं अन् महायुतचे अधिकृत उमेदवार होण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मात्र अजित पवारांनी थेट मुश्रीफांचं नाव जाहीर केल्याने कोल्हापुरात मात्र चर्चाच चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
संजय मंडलिक यांनी कोल्हापुरातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. विधानसभा मतदारसंघात मंडलिक गट हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहणार असल्याचे संकेत माजी खासदार संजय मंडलिक यांनी दिले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या बिद्रीतील कार्यक्रमात माजी खासदार संजय मंडलिक यांनी हजेरी लावली. आम्ही महायुतीचा घटक त्यामुळे कोणासोबत राहणार ही सांगण्याची गरज सुद्धा नाही, असं म्हणत संजय मंडलिक यांनी अप्रत्यक्षरित्या हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आधी ठाकरे गटाचे माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अशातच मंडलिक गटाने देखील हसन मुश्रीफ त्यांना पाठिंबा दिल्यामुळे समरजित घाटगे यांना एकाकी झुंज द्यावी लागणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता येत्या काळात कागल आणि कोल्हापुरात नेमकं काय घडतं? या बदलत्या राजकीय समिकरणांचा कुणाला फायदा होणार? हे पाहावं लागणार आहे.