मराठी सिनेमांसाठी सरकारची कोटीच्या कोटी उड्डाणे, चित्रनगरीलाही मिळणार सुविधांची सोनेरी झालर
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेतला असून राष्ट्रपुरुष, समाजसुधारक यांच्या कार्यावर बनविण्यात येणाऱ्या मराठी चित्रपटांना आता 1 कोटी इतके अनुदान देण्यात येणार आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह राष्ट्रपुरुष, समाजसुधारक यांच्या कार्यावर बनविण्यात येणाऱ्या मराठी चित्रपटांना राज्य सरकार अनुदान देते. या अनुदानात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासोबतच कोल्हापूर येथील चित्रनगरीमध्ये अधिकाधिक सोयीसुविधा देऊन सोनेरी झालर चढविण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेतला असून राष्ट्रपुरुष, समाजसुधारक यांच्या कार्यावर बनविण्यात येणाऱ्या मराठी चित्रपटांना आता 1 कोटी इतके अनुदान देण्यात येणार आहे. यापूर्वी हे अनुदान 50 लाख इतके देण्यात येत होते. आतापर्यंत सुमारे 41 चित्रपटांना अनुदान देण्यात आले आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. राष्ट्रपुरुष, समाजसुधारक यांच्या कार्यावर बनविण्यात येणाऱ्या मराठी चित्रपटांना यापूर्वी 50 लाख रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यात वाढ करून 1 कोटी रुपयांपर्यंत देण्यात येईल.मालिका आणि सिनेमा यांनाही हे अनुदान लागू असेल. तसेच, ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगले कन्टेंट यावे यासाठी 5 तज्ञ लोकांची समिती नेमण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच मंत्रालयात झाली. या बैठकीत चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्याचा घेतला. चित्रनगरी नव्याने कार्यान्वित करण्यासाठी आधुनिकीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे राज्यातील चित्रपट सृष्टीला चालना मिळून महसूल व रोजगार निर्माण होणार आहे.
कोल्हापूर चित्रनगरीच्या आधुनिकीकरणासाठी कला, सिने क्षेत्रातील मान्यवर, निर्माते, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक तसेच दूरदर्शन मालिकांचे व्यावसायिक प्रमुख यांच्याशी समन्वय साधण्यात आला आणि त्याअनुषंगाने कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत चित्रनगरी परिसरात रेल्वे स्थानकाचा तसेच रेल्वे स्थानकाच्या एका बाजूस शहरी व दुसऱ्या बाजूस ग्रामीण वस्तीचा देखावा तयार करणे.
कोल्हापूर चित्रनगरीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभिकरण करणे. चित्रनगरीमध्ये रस्ते तयार करणे, पथदिवे बसविणे, येथे पाणी पुरवठ्याकरीता राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ते चित्रनगरीपर्यंत अशी 100 मि. मि. व्यासाची जलवाहिनी टाकणे, पाण्याची टाकी बांधणे, टॉकशो स्टुडीओकरिता ध्वनी प्रतिबंध व अग्निशमन योजना करणे तसेच सोलर यंत्रणा बसविणे अशी कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या कामांसाठी आवश्यक त्या सूचना देऊन मान्यता दिली. त्याआधीच्या बैठकीत बाह्ययंत्रणेद्वारे सुरक्षा रक्षक पुरविणे, कर्मचारी वर्ग पुरविणे, पाण्याची उच्चतम टाकी बांधणे या कामाचा आढावा घेण्यात आला अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार राहुल पाटील यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.