Special Report : राज्यात कोरोनाचा उद्रेक, पण कोल्हापूरने कोरोनाला कसं थोपवलं?
कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 500 पेक्षा खाली आली असून चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तीन टक्क्यांपर्यंत आहे. (kolhapur corona update coronavirus)
कोल्हापूर : एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यात मात्र ही रुग्णसंख्या मर्यादित असल्याचं सकारात्मक चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Corona updat) अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 500 पेक्षा खाली आली असून चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही तीन टक्क्यांपर्यंत आहे. जिल्हा प्रशासनाकडून लावले गेलेले कडक निर्बंध, नागरिकांकडून त्याचं होणारं पालन आणि सतर्क आरोग्य यंत्रणा यामुळेच सध्यातरी ही रुग्ण संख्या नियंत्रणात आहे. हे चित्र पुढील काळात कायम ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. (Kolhapur Corona update how Kolhapur administration stopped the spreading of coronavirus)
कोरोनाला थोपवण्यात यश
राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. रोज हजारांच्या संख्येत नव्या रुग्णांची भर पडतेय. विशेषतः मुंबई पुणे नागपूर अशा महत्वाच्या शहरांमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यभर कोरोना वाढत असला तरी काही जिल्ह्यांमध्ये अजूनही परिस्थिती नियंत्रणात असल्याचं दिसतंय. कोल्हापुरातसुद्धा कोरोना रुग्णांची सख्या आटोक्यात येताना दिसतेय. कोल्हापूर जिल्ह्यात रोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या 100 च्या आत असून एकूण सक्रिय रुग्णांची संख्यादेखील पाचशेच्या खाली आहे. राज्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने घेतलेली खबरदारी तसेच त्याची अंमलबजावणी यामुळे हे सकारात्मक चित्र असल्याचं जाणकारांचं मत आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला दिलेला प्रतिसादसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात येतेय.
प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी
राज्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने नो मास्क नो एंट्री या नियमाची पुन्हा एकदा काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. याशिवाय सण आणि समारंभामध्ये कोरोना नियमांचे पालन होत आहे की नाही, याकडेसुद्धा येथील प्रशासनाची बारिक नजर आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर येथे कडक कारवाई करण्यात येतेय. शहरासह जिल्ह्याच्या प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून वाहनधारकांवर कारवाई केली जातेय. नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांकडून आतापर्यंत लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकही सतर्क झाले असून कारवाईच्या भीतीने बहुतांश लोकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं सुरु केलं आहे. याच कारणामुळ कोल्हापुरा कोरोना संसर्ग आटोक्यात येताना दिसतोय.
तालुका पातळीवर तपासणी केंद्र तयार ठेवण्याच्या सूचना
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना स्थिती सध्या नियंत्रणात असली तरी राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता आगामी काळात कोरोना वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हमूण जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. येथे स्वॅब तपासणीची संख्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात येत आहे. तसेच खबरदारी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर्स आणि स्वॅब तपासणी केंद्र तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना प्रादुर्भावच्या सुरुवातीच्या काळात जिल्ह्यातील रुग्णसंख्या मर्यादित. होती नंतर मात्र ती हाताबाहेर गेली होती. त्यामुळे सध्याजरी कोरोना नियंत्रणात असला तरी आगामी काळात कोरोना वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी म्हणून येथे काळजी घेण्यात येत आहे. याच कारणामुळे राज्यात जरी कोरोना वाढत असला, तरी कोल्हापुरात त्याचा प्रसार आटोक्यात आहे.
मागील 6 दिवसांत जिल्ह्यात झालेल्या कोरोना चाचण्या आणि कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण
14 मार्च : 687 चाचण्या करण्यात आल्या, यापैकी 15 जण कोरोना पॉझिटिव्ह
15 मार्च : 933 चाचण्या करण्यात आल्या, यापैकी 38 जण कोरोना पॉझिटिव्ह
16 मार्च : 447 चाचण्या करण्यात आल्या, यापैकी 43 जण कोरोना पॉझिटिव्ह
17 मार्च : 899 चाचण्या करण्यात आल्या यापैकी 46 जण कोरोना पॉझिटिव्ह
18 मार्च : 315 चाचण्या करण्यात आल्या यापैकी 62 जण कोरोना पॉझिटिव्ह
19 मार्च : 1984 चाचण्या करण्यात आल्या यापैकी 63 जण कोरोना पॉझिटिव्ह
इतर बातम्या :
(Kolhapur Corona update how Kolhapur administration stopped the spreading of coronavirus)