सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, न्यायालयात…; जालन्यातील लाठीचार्जवर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
Deepak Kesarkar on Jalna Lathi Charge : सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक; जालन्यातील लाठीचार्जवर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षण प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? वाचा...
कोल्हापूर | 04 सप्टेंबर 2023 : जालन्यात झालेल्या लाठीचार्जवर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अधिकाऱ्यावर कारवाई करावी, ही मागणी केली जात आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. त्या ठिकाणी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा समाजाने शांत आणि संयमी आंदोलनं केली. आरक्षण मिळावं, हे राज्य सरकारला देखील वाटतं. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नावरही दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे हे देखील राज्याचे नेते आहेत. त्यांनी चौकशी करणं साहजिकच आहे.पण त्यातून काही मार्ग सर्वांना काढावा लागेल. अॅक्शन ताबडतोब घेतली आहे. मराठा आंदोलनातील कुणी दगडफेक करणार नाही. बाहेरचे कोण आहेत हे पाहण्यासाठी पोलीस चौकशी करत आहेत. आंदोलनाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केलेलं नाही. लवकरच त्यावर तोडगा निघेल, असा शब्दही दीपक केसरकर यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा आंदोलकांशी फोनवरून संवाद सुरू आहेत. हे घडण्याआधापासून मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत. प्रत्यक्ष भेट घेतली नाही म्हणजे दुर्लक्ष आहे, असं नाही. आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली. ती बैठक पार पडली आहे. लवकरच यावर तोडगा निघेल, असं दीपक केसरकर म्हणालेत.
मराठा समाजाबदल विशेष कायदा केला. तो कोर्टात टिकला. हे आम्ही काहीतरी करतोय, याचा पुरावा आहे. काही करत नाही, असं होऊ शकत नाही. राज्य सरकार जागरूक राहून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सरकारने पानं पुसली असं विरोधक म्हणू शकत नाहीत, असं केसरकर म्हणालेत.
आवश्यक असेल तर परीक्षा पुढे ढकलली जाईल. जर परिस्थिती तशी असेल तर निर्णय घेऊ. मुलांच्या भविष्यावर कोणताही परिणाम पडणार नाही. याची काळजी घेतली जाईल, असा शब्दही त्यांनी दिला आहे. हसन मुश्रीफ हे ज्येष्ठ नेते आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शासन दरबारी उपक्रम घेतला आहे. जर गरज असेल तर मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून जनता दरबार मीही घेण्याचा प्रयत्न करतो, असं म्हणत दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.