एकीकडे भोंग्यांचं राजकारण तर कोल्हापुरात सामाजिक सलोखा; हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन
इचलकरंजीमधील इंदिरानगरात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती व ईद-ए-मिलाद असे सण मोठ्या उत्साहात सर्वांच्या सहभागातून साजरे केले जातात. या भागात एकता आणि बंधुता राखून सगळ्याच कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या थाटात केले जाते.

कोल्हापूरः राज ठाकरे मस्जिदीवरील भोंगा (Loudspeaker) आणि हनुमान चालीसा या त्यांच्या वक्तव्यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर काही नेत्यांनी भोंगा लावून चालीसा म्हणण्याचेही प्रकार घडले. मात्र या सगळ्या वादातही कोल्हापूरातील इचलकरंजीत मात्र सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले. वस्त्रनगरी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी (Kolhapur Ichalkaranji) शहरातील हनुमान मंदिरातच इफ्तार पार्टीचे (Iftar Party) आयोजन करण्यात आल्याने समाजात एक वेगळा संदेश गेला आहे.
सर्वधर्मीय इफ्तार पार्टी
इचलकरंजीतील इंदिरानगर परिसरातील भाऊ ग्रुपतर्फे महारुद्र हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सध्या मुस्लीम समाजाचा रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात एकीकडे भोंग्यांचे राजकारण सुरु असताना आणि सामाजिक वातावरण गढूळ झालेले असतानाही वस्त्रनगरीत मात्र सामाजिक संदेश देण्यात आला.
एकता आणि बंधुता
इचलकरंजीमधील इंदिरानगरात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती व ईद-ए-मिलाद असे सण मोठ्या उत्साहात सर्वांच्या सहभागातून साजरे केले जातात. या भागात एकता आणि बंधुता राखून सगळ्याच कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या थाटात केले जाते. आणि विशेष म्हणजे सर्व जण एकमेकांच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभागी घेतात. त्याच अनुषंगाने सोमवारी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
वादाकडे दुर्लक्ष
राज्यात सुरू असलेल्या राजकीय आणि सामाजिक वादाकडे दुर्लक्ष करत या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी आपापसात समन्वय ठेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि बंधुता कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे असा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला.
शांतता टिकवणे सर्वांची जबाबदारी
आपल्या जिल्ह्याची शांतता टिकवून ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे. हिंसा करण्याची शिकवण कोणताही धर्म देत नाही. संयम, नियंत्रण ठेवण्याची आपली क्षमता आपल्याला उपवास आणि रोजातून समजते, असे अजिज खान यांनी सांगितले. सायंकाळी 6.53 वाजता रोजा सोडल्यानंतर सर्वांनी अल्पोपाहार घेतला. इफ्तार पार्टीत बशीर करडी, दस्तगीर अत्तार, दत्ता धुमाळ, भारत पोळ, सुखदेव माळकरी यांच्यासह नागरिकांनी सहभाग नोंदविला होता.