घरात ईडीची कारवाई, बाहेर कार्यकर्ते आक्रमक; केसाला जरी धक्का लागला तर… हसन मुश्रीफ समर्थकांचा इशारा काय…
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने भल्या पहाटे छापेमारी केली आहे. त्यानंतर घराच्या बाहेर कार्यकर्ते एकवटल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घरी पहाटेच छापेमारी केली आहे. महिनाभराच्या अंतराने ही दुसऱ्यांदा छापेमारी केली जात आहे. मोठ्या सुरक्षेत ईडीचे अधिकारी दाखल झाल्याने हसन मुश्रीफ समर्थक आक्रमक झाले आहे. यापूर्वी देखील ईडीकडून छापेमारी केली जात असतांना हसन मुश्रीफ यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात एकवटले होते. आताही पुन्हा कागलच्या घराबाहेर एकवटले असून ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहे. ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ केली जाण्याची शक्यता असल्याने कार्यकर्ते हळूहळू वाढत चालले असून ईडीच्या अधिकाऱ्यांनाचा इशारा देत आहे. एकूणच हसन मुश्रीफ यांच्या कागलच्या घराबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोल्हापूर येथील संताजी घोरपडे साखर कारखान्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. त्यावरून दुसऱ्यांदा त्यांच्या घरावर ही धाड टाकण्यात आली आहे. कोलकाता येथील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून 158 कोटी रुपयांचा अफरातफर झाल्याचा संशय आहे.
हसन मुश्रीफ यांच्या कारखान्यातील खात्यावर हा पैसा कोठून आला? ही कंपनी कुणाची आहे ? कोणत्या ठिकाणी ही कंपनी अस्तित्वात आहे ? विविध आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आले होते. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हे आरोप केले होते. त्यानंतर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.
आज ( 11 मार्च ) पहाटेच्या वेळेला ईडीचे पाच ते सहा अधिकारी केंद्रीय सुरक्षा रक्षकांसह हसन मुश्रीफ यांच्या घरी पहाटेच्या वेळेला धाड टाकली आहे. पाच ते सहा तास झाले चौकशी सुरू असल्याने कार्यकर्ते हळूहळू हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर जमू लागले आहे.
हसन मुश्रीफ यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तींनाही घरात प्रवेश नाकारल्यानंतर ईडीचे पथक आल्याचे समोर आले होते. त्यामध्ये आता कार्यकर्ते घराच्या बाहेर एकत्र जमले असतांना ईडीच्या विरोधात घोषणाबाजी देत आहे. घरातील कुणाच्या केसाला जरी धक्का लागला तरी सोडणार नाही असा इशारा महिला कार्यकर्त्यांनी दिला आहे.
घरात मुलं आजारी आहे. त्यांना ताप आहे तरी देखील कुठलाही विचार केला जात नसल्याने हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक होत आहे. घरात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, स्थानिक पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान असल्याने त्यांना रोखलं जात आहे.
आम्हाला गोळ्या घालून जावा म्हणत महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहे. ईडीच्या विरोधात घोषणाबाजी देत इशारे दिले जात असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.