Kolhapur news : गरब्याला जाण्यासाठी चक्क अँब्युलन्सचा वापर, अपघातानंतर धक्कादायक प्रकार उघड
कोल्हापूरमध्ये काही विद्यार्थिनी गरबा खेळायला जात होत्या, मात्र ते त्यांना चांगलेच महागात पडले. हा प्रकार उघडकीस येताच शहरातील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कोल्हापूर | 17 ऑक्टोबर 2023 : देशभरात सध्या नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देवीची उपासना करत भाविक तल्लीन झाले आहेत. नवरात्र म्हटलं की आठवतो गरबा.. देशासह राज्यभरातही विविध ठिकाणी गरब्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूरमध्येही (KolhapurNews) असाच एका गरबा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र त्यामध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या तरूणींच्या एका कृतीमुळे गदारोळ माजला आहे.
गरबा खेळायला जाण्यासाठी काही विद्यार्थिनींनी चक्क रुग्णवाहिका (Ambulance) वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुसाट वेगाने जाणाऱ्या या रुग्णवाहिकेची वाहनांना धडक बसून मोठा अपघात झाला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
सायरन वाजवत सुसाट वेगाने जात होती अँब्युलन्स
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर (Kolhapur) शहरातील हॉकी स्टेडियम ते नॉर्थ स्टार हॉस्पिटल परिसरात रविवारी रात्री उशीरा हा प्रकार घडला. शासकीय रुग्णालयाची ही रुग्णवाहिका सायरन वाजवत सुसाट वेगाने धावत होती. तेवढ्यात या रुग्णवाहिकेची एक कार आणि दोन बाईक्सना जोरात धडक बसली. मात्र तरीही ती वेगाने पुढे निघाली. हे पाहून काही लोकांनी त्या रुग्णवाहिकेचा पाठलाग सुरू केला.
या अपघातानांतर रुग्णवाहिकेत पेशंट आहे का, त्याला काही त्रास झाला नाही ना हे पाहण्यासाठी स्थानिकांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग करून ती थांबवली आणि मागचं दार उघडण्यास सांगितलं. मात्र चालकाने सुरुवातीला दार उघडण्यास नकार दिला. पण नागरिकांच्या दबावाला बळी पडून त्याने मागचं दार उघडलं असता आतील दृश्य पाहून सगळेच हादरले. गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या काही तरूणी दाटीवाटीने आतमध्ये बसल्याचे आढळले.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी
त्या तरूणींकडे अधिक चौकशी करण्यात आली असता त्या सर्वजणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असल्याचे सांगण्यात आले. आम्ही सर्व गरबा खेळायला जात आहोत, असं त्या तरूणींनी सांगितलं. मात्र गरबा खेळायला जाण्यासठी रुग्णवाहिकेचा असा गैरवापर करण्यात आल्याचे समोर येता नागरिक अतिशय संतापले. त्यांनी तातडीने पोलिसांना याप्रकरणी माहिती दिली.
त्यानंतर जुना राजवाडा पोलिसांचे गस्ती पथक तेथे दाखल झाले आणि त्यांनी चालकाचा परवाना तपसाला. पुन्हा असा प्रकार करू नका अशी ताकीद देत पोलिसांनी त्यांना सोडून दिले. या घटनेमुळे शहरातील नागरिकांद्वारे संताप व्यक्त करण्यात येत आहे.