Kolhapur North Assembly : कोल्हापुरातल्या विजयानंतर पहिल्यांदाच जयश्री जाधवांनी घेतली शरद पवार, अजितदादांची भेट, चर्चा काय?
कोल्हापूर उत्तरच्या जनतेने तुमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चांगले काम करा, महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत आहे, असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्रीताई जाधव यांचे अभिनंदन केले.
मुंबई : उत्तर कोल्हापूरच्या निवडणुकीत (Kolhapur North Assembly) मोठा विजय प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांचा जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. तसेच त्यांनी अजित पवार यांचीही भेट घेतली आहे. कोल्हापूर उत्तरच्या जनतेने तुमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चांगले काम करा, महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत आहे, असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्रीताई जाधव यांचे अभिनंदन केले. कोल्हापुरात चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यू झाल्याने त्या जागेसाठी पुन्हा पोटनिवडणूक लागली होती. भाजकडून या ठिकाणी सत्यजीत कदम यांना तिकीट देण्यात आलं होतं. तर महाविकास आघाडीने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधवांना उमेदवारी देत या ठिकाणी लढवली. या विजयात मोठा वाटा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचाही आहे. या विजयानंतर महाविकास आघाडीला आव्हान देणाऱ्या चंद्रकांत पाटीलांवरही जोरदार टीका होत आहे.
अटीतटीच्या लढतीत मोठा विजय
ही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक नेते कोल्हापुरात ठाण मांडून बसले होते. भाजपकडून चंद्रकांत पाटील प्रचाराच्या मैदानात उतरले होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही कोल्हापुरात जोरदार प्रचार करताना दिसून आले होते. तर महाविकास आघाडीत सुरूवातीला नारजीचे सूर दिसून आले होते. मात्र राजेश क्षीरसागर यांची नारजी दूर करण्यात महाविकास आघाडीला यश आल्याने त्याचीही मोठी मदत मिळाली होती. त्या विजयानंतर आज जयश्री पाटील या मुंबईत दिसून आल्या.
भेटीला कोण कोण उपस्थित?
कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्रीताई जाधव यांनी मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.
जनतेसाठी चांगलं काम करा
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघांच्या विकासासाठी तसेच सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी चांगले काम करा. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही देत नवनिर्वाचीत आमदार जयश्रीताई जाधव यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले.
Ganesh Naik : गणेश नाईकांचा पोलिसांकडून शोध सुरु, अटकेची टांगती तलवार! सूत्रांची माहिती