कोल्हापूर : सध्या कोल्हापुरात उत्तर कोल्हापुरच्या (Kolhapur North by Election) जागेसाठी चुरशीची लढत सुरू आहे. भाजप आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा आमनेसामने आले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayshree jadhav) या 50 हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील, असा दावा आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात आलाय. आज कोल्हापुरात महाविकास आघाडीतील नेत्यांची संयुक्त सभा पार पडली. ही सभा पाहिल्यावर 50 हजारापेक्षा जास्त मतांनी जयश्रीताई निवडून येतील याची खात्री झाली, असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. तर कोरोनाची बाधा झाली तरी चंद्रकांत जाधवांनी जीवाची पर्वा केली नाही. महाविकास आघाडीची संख्या 171 ची आहे. ती आपल्याला कायम ठेवायची आहे. जयश्री ताईंना निवडणून देणं म्हणजे ताराराणींना अभिवादन आहे हे लक्षात घ्या, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.
तसेच शाहूंचा समतेचा विचार महाविकास आघाडी पुढे घेऊन जात आहे. तीन पक्ष एकत्र आलो. काही जण म्हणत होते हा 8/15 दिवसांचा कार्यक्रम आहे. पण प्रत्येक संकटात महाविकास आघाडीने यशस्वी काम केलं. हे सरकार कसं पडेल याचा प्रयत्न होत आहे, कुटुंबांपर्यंत जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. तसेच पेट्रोलची 50 पैसे वाढ झाली तरी भाजपवाले आंदोलन करत होते. आता हे आंदोलक कुठे गेले हे चंद्रकांत पाटील यांना एकदा विचारा, असा टोलाही थोरात यांनी लगावला आहे.
जयंत पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घालताना, अण्णा जातील आणि आपल्यावर हा प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं. स्वतःच्या विजयाची मिरवणूक सुरू असताना गॅसचा स्फोट झाल्यानंतर आण्णा लगेच धावून गेले. अशी आठवण त्यांनी सांगितली. तसेच महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र आले की भाजपची धूळधाण उडाली आहे. भाजपच्या हातात देश गेला आणि महागाईचा आगडोंब झाला. पेट्रोलचे दर थोडे जरी वाढले तरी भाजप रस्त्यावर यायचे पण आता 117 रुपये पेट्रोल करून ठेवलं. आपल्या प्रत्येकाच्या खिशातून हे पैसे जात आहेत. या देशात महागाईवर चर्चा होत नाही, या देशात भावनांना हेलकावे देण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपला माहीत आहे जाती-जातीमध्ये तेढ निर्माण केल्याशिवाय आपलं काही चालत नाही. असा हल्लाबोलही त्यांनी चढवला.
तसेच कायदा हातात घ्यायचा आणि विरोधकांना त्रास द्यायचं सुरू आहे. हसन मुश्रीफ ऐकत नाहीत म्हणून त्यांना त्रास दिला जातोय. भाजपवाले आमचं सरकार पडण्याचे स्वप्न बघतात, आणि नवीन तारीख देतात. या देशात न्याय कुणाकडे मागायचा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे स्वतःला निवडून येता येत नाही म्हणून एमआयएमची मदत घेऊन भाजप लढत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या 86 जागा अगदी थोड्या मतांनी पडल्याय महाराष्ट्राला चंद्रकांतदादा पाटील यांची गरज आहे. असा माणूस जास्त वेळ भाजपचा प्रदेशाध्यक्ष असणं हे आपल्या सोयीचं आहे असा सोयीचा माणूस असेल तर सतेज पाटील तुम्हाला अडचण काय? असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
या सभेत सतेज पाटील यांनीही भाजपविरोधात तुफान बॅटिंग केली आहे. 2019 ला पाच वर्षांसाठी चंद्रकांत जाधव यांना निवडून आले होते. पोस्ट कोविडनंतर ऑपरेशन झालं. ऑपरेशन्स नंतर विश्रांती घेण्याची विनंती मी वारंवार केली पण त्यांनी ऐकलं नाही. शहराला विकासाच्या दृष्टीने नेण्याचं काम चंद्रकांत जाधव यांनी केलं. आता महाविकास आघाडी आहे म्हणून काँग्रेस जागा मिळाली. त्यामुळे शिवसेनेचे आभार मानायचे आहेत, असेही सतेज पाटील म्हणाले. तसेच महाविकास आघाडी अभेद्य आहे हे दाखवून देण्याची वेळ आलीय. निवडणूक बिनविरोध करायला भाजपचा सुरवातीला प्रतिसाद होता. मात्र पाच राज्याच्या निकाला नंतर त्यांचा उन्माद वाढला आणि निवडणूक लादली गेली. आज काँग्रेस न 50 वर्षात काय केलं हा प्रश्न केला जातोय. पालकमंत्री म्हणून काम केलं असत तर चंद्रकांत दादांना पुण्याला पळून जावं लागलं नसतं, असा टोला त्यांनी लगावला. जो माणूस कोल्हापूरला वाऱ्यावर सोडून पुण्याला गेल्यानंतर आज भाजपसाठी कोणत्या तोंडाने मतं मागता? असा सवालही त्यांनी केल. तसेच पुढचे काही दिवस फिल्डिंग टाईट ठेवायची आहे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
सुरूवातील नारज असणारे राजेश क्षीरसागरही मोकळ्या मनाने जयश्री जाधव यांचा प्रचार करातना दिसून आले. जयश्रीताई जाधव यांना किमान 50 हजार मतांनी निवडून द्यायचे आहे. कोल्हापुरात नमो नमो चालणार नाही. भाजपनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. कोल्हापुरात भाजप विकासावर काही बोलत नाही. मातोश्रीवरून आलेला आदेश हा शिवसैनिकांसाठी अंतिम असतो. शिवसैनिक कधीही आदेश धुडकावत नाही. 2019 साली कोल्हापुरात भाजपनं शिवसेनेबरोबर गद्दारी केली. भाजपनं विसरून जावं की सेनेचे मत भाजपला मिळणार, असे म्हणत त्यांनी भाजपला आव्हान दिलं.
’10 ते 15 महिन्यात गोव्यात आमचं सरकार’, काँग्रेस आमदार मायकल लोबो यांचा दावा!
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची महागाईची गुढी, बाळासाहेब थोरांतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल