“मी कुणाल कामराच्या पाठीशी…” उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
उद्धव ठाकरे यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरांना एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विनोदी टीकेबद्दल पाठिंबा दर्शवला आहे. ठाकरे यांनी कामरांच्या विधानांना सत्य जनभावना म्हटले आहे आणि स्टुडिओवर झालेल्या तोडफोडीचा निषेध केला आहे.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिका केली आहे. यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. आता याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. कॉमेडिअन कुणाल कामराने सत्य आसलेल्या जनभावना मांडल्या आहेत. जे चोरी करत आहेत, त्यांनी गद्दारी केली आहे. मी कुणाल कामराच्या पाठीशी आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी नुकतंच विधानभवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना कुणाल कामराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली. मी कुणाल कामराच्या पाठीशी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्य आणि देश तुमच्या हातात आहे तरी दंगल कशी होती?
“कुणाल कामराने काहीही चुकीचे म्हटले असे मला वाटत नाही. कुणाल कामराने सत्य असलेल्या जनभावना मांडल्या आहेत. जे चोरी करत आहेत, त्यांनी गद्दारी केली आहे. मी कुणाल कामराच्या पाठीशी आहे. सुपारी सुपारी काय बोलता? नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती. औरंगजेबाच्या कबरीची सुपारी कोणी दिली होती? राज्य आणि देश तुमच्या हातात आहे तरी दंगल कशी होती?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
मुख्यमंत्र्यांचे अधिकार कमी करण्याचे प्रयत्न
“काल जी तोडफोड केली आहे, ती गद्दार सेनेने केली आहे. शिवसेनेनी केलेली नाही. या गद्दारांना कोरटकर, सोलापुरकर दिसत नाही. मुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना समान पाहिजे. त्या स्टुडिओला तोडफोडीची भरपाई दिली पाहिजे. अभिव्यक्ती स्वातांत्र्य कुठले आम्ही तर उघडपणे बोलतो. मुख्यमंत्र्यांचे अधिकार कमी करण्याचे प्रयत्न आहे”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
नेमकं काय घडलं?
कुणाल कामराने मुंबईच्या खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये कॉमेडी शो केला. या शोमध्ये एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत हिंदी गाण्यांचं रिमिक्स करून त्यानं गाणी म्हणून दाखवली. यावरून आता मोठा वाद सुरू झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या क्लबची तोडफोड केली. एकीकडे तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असताना दुसरीकडे कुणाल कामराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.