Sanjay Raut : मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली करा, कुणालच्या स्टुडिओवरील हल्लेखोरांकडून वसूली करा; संजय राऊत भडकले
कुणाल कामराच्या विडंबनात्मक शो नंतर शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीमुळे संजय राऊत संतापले. राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीची आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी दंगलखोरांकडून नुकसानीची भरपाई वसूल करण्याचीही मागणी केली आहे. राऊत यांनी कामरावर होत असलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांबद्दलही चिंता व्यक्त केली.

कॉमेडियन कुणाल कामराने एका शोमध्ये सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर शिवसैनिक भडकले आहेत. शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता, कामराने त्यांच्यावर टीका केली, जी शिवसैनिकांना बरीच झोंबली. तो शो जिथे होता, त्या हॉटेलमध्ये जाऊन काल रात्री शिवसैनिकांनी शोच्या सेटची तोडफोड केली. मात्र याच मुद्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत संतापले असून मुंहईत झालेल्या तोडफोडीनंतर या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार झाला, त्या पोलीस स्टेशनचे एसीपी, सीनिअर पीआय यांच्यावर ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे,असे राऊत म्हणाले. मराचं नुकसान झालं ते दंगलखोरांकडून वसूल करा, अशी मागणीही राऊत यांनी केली.
धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृहखातं चालवणं झेपत नाही, हे स्पष्ट दिसतं. कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे. काय केलं त्यांनी? हा संपूर्ण कट दीड दोन तास आधी शिजला. काय करत होते मुंबईचे पोलीस. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार झाला, त्या पोलीस स्टेशनचे एसीपी, सीनिअर पीआय यांच्यावर ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. इतकं गंभीर प्रकरण आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत देशात आपल्या राज्याची नाचक्की होत आहे असं राऊतांनी सुनावलं. आपले गृहमंत्री भाषणं आणि प्रवचनं देत फिरत आहेत. मग दंगलखोरांवर कारवाई करा आणि कामराचं नुकसान झालं ते दंगलखोरांकडून वसूल करा. कुणाल कामराला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. सोशल मीडियावरून धमक्या दिल्या जात आहेत. हे कोण लोकं आहेत. आम्ही धमक्यांना भीक घालत नाहीत. पण तो कलावंत आहे,. त्याला संरक्षण द्या असं म्हणत नाही. पण धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा असं संजय राऊत म्हणाले.
आचार्य अत्रे यांची झेंडूंची फुले वाचा. राजकीय विडंबन आणि व्यंग होतंच असतं. नाही तर बाळासाहेब ठाकरे जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार होऊच शकले नसते. राजकारणातील लोकांवर सर्वच टीका करतात. ती सहन केली पाहिजे. बाळासाहेबांनी टीका सहन केली. शरद पवार यांनी सहन केली. विलासरावांनी केली. मोदींचं सरकार आलं तेव्हापासून टीका सहन करायची नाही ही परंपरा पडली. आणीबाणीतही असं घडलं नाही. अशा टोकाच्या भूमिका कोणी घेतल्या नव्हत्या. फडणवीस यांनी तात्काळ दंगलखोरांवर कारवाई करावी. दंगलखोरांकडूनच रक्कम वसूल केली पाहिजे या मागणीचा राऊतांनी पुनरुच्चार केला.
विधिमंडळात जे चाललंय ते पॉडकास्टपेक्षा भयंकर
आम्ही लेखक, पॉडकास्ट करणाऱ्यांच्या मागे आम्ही आहोत. मर्यादा पाळल्या पाहिजे. पण व्यक्तिगत टीकाटिप्पणी करू नये. विधिमंडळात जे चाललंय ते पॉडकास्टपेक्षा भयंकर आहे. त्यावर बंधन आहे का. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग लेखक, कलावंतांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य का नाही? असा सवाल राऊतांनी विचारला.
सखाराम बाईंडरबाबत हा संस्कृतीचा विषय होता. घाशीराम कोतवालाला विरोध केला. तो संस्कृती आणि इतिहास उद्ध्वस्त करण्याचा विषय आहे. ज्यांनी काल हल्ला केला, त्यांनी प्रशांत कोरटकरवर का हल्ला केला नाही? शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर तुमच्या सरकारच्या डोळ्यासमोर बेपत्ता होतो, त्याच्यावर हल्ला करण्याची हिंमत दाखवली नाही. ही गांडुगिरी आहे. कुणाल साधा लेखक आहे. त्याच्यावर हल्ला केला. याला गांडुगिरी म्हणतात. करा ना कोरटकरवर हल्ला. अख्खा महाराष्ट्र उभा राहिल. पण कुणालवर हल्ला केला. का तर दाढीवाला म्हणाला म्हणून. मोदींनाही दाढी आहे. अमित शाह यांनाही दाढी आहे. दाढीवाल्यांचा अपमान झाला म्हणून दाढ्या काढायच्या का? असं राऊत म्हणाले.
मी रोज टीकात्मक लिहितो. माझं काम आहे ते. मग रोज गुन्हे दाखल होतील. विधासनभेतील कामकाज सदस्यांचं पाहिलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. एकनाथ शिंदेंचं सभागृहातील भाषण वाचा त्यांच्यावर गुन्हे दाखल होईल. कमजोर लोकांवर कशाला. कुणाल कामरावर गुन्हा का? असा सवाल राऊत यांनी विचारला.