कुणाल कामराला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाका, त्याला शिवसैनिक… शिंदेंच्या कट्टर समर्थकाचा इशारा
कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी कामराला मानसिक रुग्णालयात दाखल करण्याची धमकी दिली आहे. शिंदे गटाच्या समर्थनाने कामराविरुद्धचा हा संताप वाढत आहे.

कॉमेडियन कुणार कामराच्या एका विडंबनात्मक गाण्यामुळे राज्यात नवा वाद उद्भवला आहे. कुणाल कामराने गायलेल्या एका गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केल्याचा दावा शिवसेनेने केल. यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार इथल्या हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली. या वादादरम्यान काही जणांनी कुणालचा विरोध केला तर काही जणांनी कुणालचे समर्थन केले. एकनाथ शिंदे गटाने हा सुपारी घेऊन केलेला प्रकार असल्याचा घणाघात केला. हे विडंबन नाही तर सुपारी घेऊन केलेली बदनामी असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. या मुद्दावरून विरोधक आणि सत्ताधारी गट आमने-सामने आले. आता याप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या कट्टर समर्थक आमदाराने कुणाल कामराला इशारा दिला आहे.
अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कुणाल कामराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी जोरदार टीका केली. कॉमेडियन कुणाल कामरा याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाका, असा घणाघात डॉ. बालाजी किणीकर यांनी केला.
शिंदे समर्थकांमध्ये संतापाची लाट
मंगळवारी बालाजी किणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथच्या खुंटवली भागातील भवानी चौकात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बालाजी किणीकर यांनी कुणाल कामरावर सडकून टीका केली. बालाजी किणीकर हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. अलीकडेच कॉमेडियन कुणाल कामराने एका गाण्याच्या माध्यमातून शिंदेंवर टीका केल्यामुळे शिंदे समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शिवसैनिक त्याला त्याची जागा दाखवून देतील
“कॉमेडियन कुणाल कामरा याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाका. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता टीका केली असली, तरी त्याची टीका न कळण्याइतपत शिवसैनिक दूधखुळे नक्कीच नाहीत. त्यामुळे शिवसैनिक त्याला त्याची जागा दाखवून देतील”, अशा शब्दात किणीकरांनी संताप व्यक्त केला.
त्याला वेड्याच्या रुग्णालयात घेऊन जावं लागेल
“आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसेनेने त्याला काय दाखवायचं ते दाखवलेलं आहे. साहेबांचं नाव न घेता तो जे काही बोललाय हे न समजण्याऐवढे आम्ही खुळे नाहीत. हे एवढं करुनही जर तो तेच करत असेल तर मला वाटतं, त्याला वेड्याच्या रुग्णालयात घेऊन जावं लागेल”, असेही बालाजी किणीकर म्हणाले.