कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मोठी बातमी समोर येत आहे, कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या असून, आता या प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मोठी घोषणा केली आहे.

कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Kunal Kamra
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 24, 2025 | 4:12 PM

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिका केली आहे. यावरून चांगलाच वाद झाला. शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. रविवारी रात्री शिवसैनिकांकडून मुंबईतील हॉटेलमध्ये जाऊन कामराच्या शोच्या सेटची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे तिथे मोठा गोंधळ निर्माण झाला. द हॅबिटॅट स्टुडिओची 60 ते 70 लोकांकडून तोडफोड करण्यात आली, त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत खार पोलिसांनी 11 शिवसैनिकांना अटक केली होती, त्यांना आज जामीन देखील मंजूर झाला आहे.

दरम्यान या प्रकरणात आता स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिका केली होती, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावर बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता कुणाल कामराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले योगेश कदम? 

कुणाल कामराच्या व्हिडीओमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याच्या सेटची देखील तोडफोड करण्यात आली आहे. कुणाल कामरानं माफी मागणी अन्यथा आम्ही त्याला रस्त्याने फिरू देणार नाहीत, असा इशारा देखील शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे. या प्रकरणात विधान परिषदेत बोलताना योगेश कदम यांनी मोठी घोषणा केली आहे.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचे सर्व सीडीआर तपासले जाणार, सीडीआरसोबत सर्व कॉल रेकॉर्डिंग आणि बँक खात्याची देखील चौकशी होणार आहे. या मागे कोण आहे, कुणाला कामराचा बोलविता धनी कोण आहे? हे शोधून काढणार, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे कॉमेडिअन कुणाल कामराने सत्य आसलेल्या जनभावना मांडल्या आहेत.  मी त्याच्या पाठिशी उभा आहे, अशी प्रतिक्रिया या प्रकरणावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून चांगलाच वाद पेटण्याची चिन्ह आहेत. शिवसेना आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.