कुणाल टिळक यांच्याकडून रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा, कुणाल टिळक यांचा रोख कुणावर ?
कसबा मतदार संघ हा भाजपचा गड मानला जातो. मात्र, यावेळी मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी टिळक कुटुंबात उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती.
पुणे : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कसबा ( Kasba ) मतदार संघ भाजपच्या हातून निसटला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले असून हेमंत रासने ( Hemant Rasne ) यांचा पराभव झाला आहे. 28 वर्षांनी भाजपचा मोठा पराभव झाला आहे. रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाला असून भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. त्यावर मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा देत कुणाल टिळक यांनी भाजप कुठं कमी पडलं हे पाहावं लागेल असं म्हंटलं आहे. एकूणच कुणाल टिळक यांना उमेदवारी दिली नाही त्यावरून नाराजी असल्याची चर्चा देखील सुरुवातीला झाली होती. त्यामुळे भाजप कुठे कमी पडलं हे पाहवं लागेल असं कुणाल टिळक ( Kunal Tilak ) यांनी म्हंटल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
कसबा मतदार संघ हा भाजपचा गड मानला जातो. यामध्ये भाजपकडून नेहमीच ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला जातो आणि तो निवडून देखील येतो. मात्र, याचवेळी मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता.
त्यानंतर टिळक कुटुंबातच ही उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता असतांना शैलेश टिळक किंवा कुणाल टिळक यांना ही उमेदवारी दिली जाईल अशी स्थिती होती. मात्र त्यावेळी भाजपकडून त्यांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती.
हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रॅली काढत जाहीर सभा घेतली होती. त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेची मानली गेलेली ही निवडणूक कॉंग्रेसने जिंकली आहे.
भाजपला मोठा धक्का या निवडणुकीत बसला आहे. खरंतर भाजपचा बालेकिल्ला म्हणून कसबा मतदार संघ ओळखला जात होता. त्यावरच आता मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी कसब्याच्या निकालावर भाष्य केलं आहे.
कॉंग्रेसचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा देत असतांना भाजप कुठं कमी पडलं हे पाहावं लागेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे कुणाल टिळक यांच्या मनात अजूनही उमेदवारी दिली नाही म्हणून नारजी आहे का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
तर आगामी काळात उमेदवारी मिळावी यासाठी कुणाला टिळक यांनी इशारा तर दिला नाही ना ? अशीही चर्चा आता कसबा मतदार संघात होऊ लागली आहे. ब्राह्मण उमेदवार दिला असता तर निवडणुकीत चित्र वेगळं असतं का ? असा तर्क लावला जात आहे.
मात्र, या विजयानंतर टिळक कुटुंबातच ही उमेदवारी दिली असती तर सहानुभूतीचा फरक पडला असता असेही बोलले जात आहे. मात्र रासने यांचे काम भाजपच्या एका गटाने केले नाही अशीही कुजबूज या निमित्ताने होऊ लागली आहे.