राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडकी बहीण योजना ही एक राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये सरकारकडून जमा करण्यात येतात. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली असून जुलैपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे एकूण पाच हपते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. आता सर्वाचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे डिसेंबरचा हपता कधी जमा होणार त्याकडे.
मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करण्यात येणार अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र लाडकी बहीण योजनेच्या निकषात कोणतेही बदल होणार नसल्याचं आता समोर आलं आहे. याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे?
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणत्याही लेखी पद्धतीच्या सूचना, आदेश, शासन निर्णय योजनेतील निकष बदलाबाबत विभागाने काढलेला नाहीये. विनाकारण माध्यमांवर काही अफवा पसरवल्या जात आहेत, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नये. लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने माता-भगिनीसाठी काढलेली आहे, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ही योजना यशस्वीरित्या चालू राहणार आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांना शुभेच्छा
दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आदिती तटकरे यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘देशाचे लोकप्रिय नेते शरद पवार साहेबांना मनापासून शुभेच्छा देते, त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं, गेल्या 50- 55 वर्षांपासून सामाजिक जीवनामध्ये देशासाठी व राज्याच्या विकासात त्यांचं योगदान आणि सहभाग आहे. सर्वच राजकीय नेत्यांसाठी ते प्रेरणादायी आहेत. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.