Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदेंकडून गुडन्यूज, योजनेबाबत दिली सर्वात महत्त्वाची माहिती
लाडकी बहीण या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकूण पाच हप्ते जमा झाले आहेत. आता डिसेंबरचा हफ्त कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेची घोषणा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. आतापर्यंत या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पाच हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता लाभार्थी महिलांसह सर्वांचं लक्ष डिसेंबरचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याकडे लागलं आहे.
विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनली होती. या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी देखील तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं. दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. तर दुसरीकडे आम्ही महिलांना 2 हजार 100 रुपये देऊ असं महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2 हजार 100 रुपये कधीपासून मिळणार याकडे देखील सर्वांचच लक्ष लागलं आहे. मात्र पुढील अजून काही महिने तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपयेच जमा होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2 हजार 100 रुपये मिळू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. ही योजना कधीही बंद पडणार नसून चालूच राहणार आहे, डिसेंबरचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर या योजनेचे पैसे जमा होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं. त्यामुळे आता लवकरच हे पैसे बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.