LadKi Bahin Yojana : अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? सर्वात मोठी अपडेट
लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. या सदंर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे.
गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरीम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. ही राज्य सरकारची एक महत्त्वकाक्षी योजना आहे. मात्र सध्या ही योजना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुख्य मुद्दा बनली असून, या योजनेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात या योजनेंतर्गत पैसे येण्यास सुरूवात झाली. निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे अॅडव्हांस पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र आता सर्वांनाच प्रतिक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार.
एकीकडे या योजनेवरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करून महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. आता या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी अपडेट दिली आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मला म्हणालेत दहा दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो, लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का? सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा, महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे . विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू, आमची नियत साफ आहे, हे सरकार देना बँक आहे घेना बँक नाही, निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हफ्ता खात्यामध्ये जमा होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे, ते रत्नागिरीमध्ये बोलत होते.