राज्यातल्या या जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढला, शेतकरी चिंतेत
मागच्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं शेतकरी चांगलेच चिंतेत आले आहेत.
महाराष्ट्र : महाराष्ट्रातल्या (Maharashtra) अनेक जिल्ह्यात सध्या लंपीचा आजार पुन्हा सक्रीय झाला आहे. अनेक जनावर दगावण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी आपल्या जनावराची काळजी घेताना दिसत आहेत. धुळे जिल्ह्यात लंपी (lampi virus) आजाराचा प्रादुर्भाव जनावरांवरती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लंपी संसर्ग आढळून आलेल्या केंद्रापासून पाच किलोमीटर परिसर हा प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी हा निर्णय (lampi virus cow treatment) घेतला असून, याबाबत तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका वगळता जिल्ह्यातील इतर तीन तालुक्यांमध्ये लंपी आजाराचा संसर्ग झालेली अधिक जनावर आढळून आली आहेत. जिल्ह्यात साधारण 88 जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. त्यापैकी 12 जनावर बरी झाली असल्याची माहिती मिळाली आहे, त्यापैकी एका जनावराचा मृत्यू झाला आहे. लंपी स्किन रोग प्रादुर्भावग्रस्त गावापासून दहा किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील जनावरांची खरेदी विक्री, वाहतूक, जत्रा तसेच प्रदर्शन आयोजनावर बंदी घालण्यात आलेली आहे.
लातुर जिल्ह्यात लंपी आजाराने पुन्हा डोके वर काढले असून जिल्ह्यात सध्या 322 पशुधनाला लंपीची लागण झाली आहे. आतापर्यंत 2 लाख 57 हजार गाई-म्हैशींना लसीकरण करण्यात आले आहे. लंपीने पुन्हा डोके वर काढल्याने पशुपालक शेतकरी मात्र चिंता व्यक्त करीत आहेत.
७ तालुक्यात ७८ ठिकाणी जनावरांमध्ये लंम्पीने थैमान
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर व धरणगाव या ७ तालुक्यात ७८ ठिकाणी जनावरांमध्ये लंम्पीने थैमान घातले आहे. आजाराचे प्रमाण वाढले असल्यामुळे या सात तालुक्यातील सर्व जनावरांचा आठवडे बाजार हा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. या ७ तालुक्यातील गुरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद राहणार आहेत. जिल्ह्यात इतर राज्यामधून आंतरराज्य, आंतरजिल्हा व आंतरतालुका पशुधनाची होणारी वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील वरील ७ बाधीत तालुक्यात पशुधन एकत्र येतील असे सार्वजनिक चराई व सार्वजनिक गुरांसाठीचे पाणी पिण्याचे सार्वजनिक हौद पुढील १५ दिवस बंद ठेवण्यात येतील असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.