दुष्काळात रेल्वेने पाणी; आता लातूरकडून सांगलीच्या उपकाराची परतफेड!
लातूर हा दुष्काळग्रस्त भाग आहे. येथे नेहमीच पाणी टंचाई असते. लातूरला दुष्काळात जेव्हा पाण्याची गरज होती, तेव्हा सांगलीतील मिरज येथून रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा करण्यात आला होता. सांगलीच्या त्या उपकाराची परतफेड आता लातूरकडून करण्यात येत आहे.
सांगली : यंदाचा पावसाळा कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील लोक कधीही विसरु शकणार नाहीत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये महापुराने अक्षरश: थैमान घातलं. पंचगंगा, कोयना नदीचं कधी नव्हे ते रौद्ररुप या जिल्ह्यातील नागरिकांनी पाहिलं. या महाप्रलयात लाखो लोकांची घरं, शेती, व्यवसाय उद्ध्वस्त झाले. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात महापुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक गावं ही पाण्याखाली गेली, अनेकांना त्यांचं घर सोडावं लागलं. या सर्वच पूरग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अनेक भागात आता पावसाने विश्रांती घेतली आहे, काही ठिकाणी पाणीही ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील हरिपुरात महापुराची स्थिती अद्यापही गंभीर आहे. सांगलीवर कोसळलेल्या या संकटात त्यांची मदत करण्यासाठी दुष्काळग्रस्त लातूरही पुढे सरसावलं आहे.
लातूर हा दुष्काळग्रस्त भाग आहे. येथे नेहमीच पाणी टंचाई असते. लातूरला दुष्काळात जेव्हा पाण्याची गरज होती, तेव्हा सांगलीतील मिरज येथून रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा करण्यात आला होता. सांगलीच्या त्या उपकाराची परतफेड आता लातूरकडून करण्यात येत आहे. सांगलीतील हरिपूर या पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचं, त्यांच्यापर्यंत खाण्या-पिण्याच्या वस्तू पोहोचवण्याचं काम लातुरातील जवान करत आहेत. तर लातूर जिल्हा प्रशासनाचं आपत्ती व्यवस्थापनाची टीमही दिवस-रात्र युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे.
सांगलीचा महापूर आता ओसरु लागला आहे. पाण्याची पातळी वाढताना फुटांनी वाढली, मात्र ओसरताना इंच-इंच पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत होण्यास बराच कालावधी लागणार आहे. सांगली शहरातील महापुराचे पाणी ओसरु लागले असले, तरी हरिपुरात अद्यापही परिस्थिति गंभीरच आहे. हे गाव अजूनही पाण्याखाली आहे. या पुराच्या पाण्यात कित्येक जनावर मृत पावली आहेत. घरं, दुकानं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. या ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. या ठिकाणी अडकलेल्या लोकांपर्यंत खाण्या-पिण्याच्या वस्तू पोहोचवण्याचं काम लातुरातील जवान करत आहेत. गेल्या चार दिवसांपासून हे पथक या ठिकाणी अविरत हे कार्य करत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने लातूरने सांगलीच्या उपकारांची परतफेड केली आहे.
VIDEO :