लातुरात महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींचा अचानक राजीनामा
महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी, लातूर : भाजप पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत नाराजीमुळे लातूर महापालिकेत महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींनी पदाचा राजीनामा दिलाय. अचानकपणे महापौर आणि उपमहापौरांनी राजीनामे दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या अंतर्गत धुसफुसीचं रुपांतर आता राजीनाम्यांमध्ये झालंय. लातूर महापालिकेचे महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, स्थायी सभापती शैलेश गोजमगुंडे […]
महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी, लातूर : भाजप पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत नाराजीमुळे लातूर महापालिकेत महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींनी पदाचा राजीनामा दिलाय. अचानकपणे महापौर आणि उपमहापौरांनी राजीनामे दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या अंतर्गत धुसफुसीचं रुपांतर आता राजीनाम्यांमध्ये झालंय.
लातूर महापालिकेचे महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, स्थायी सभापती शैलेश गोजमगुंडे आणि स्थायी समितीचे सद्यस्यांनी अचानक राजीनामे भाजप जिल्ह्याध्यक्षांकडे सोपवले. गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सत्ताधारी भाजपला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडलेली नाही. परवाच महापौर सुरेश पवार यांनी स्वतःच्या घराचं बांधकाम करताना अतिक्रमण केल्याचा मुद्दा काँग्रेस नगरसेवकांनी चांगलाच लावून धरला. त्यामुळेच महापौरांनी राजीनामा दिलाय, असं आता काँग्रेसचं म्हणणं आहे.
महापालिकेत भाजप 36, तर काँग्रेस 33 आणि राष्ट्रवादी एक, असं पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे महापालिकेत काठावर सत्ताधारी असलेल्या भाजपची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.
महापौर सुरेश पवार हे काँग्रेसमधून भाजपात येऊन नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक त्यांना धारेवर धरायचे, आता भाजप कोणाला महापौर म्हणून आणणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
महापालिकेत खांदेपालट होऊ घातली असली तरी सभागृहात मात्र जुनाच गोंधळ जास्त पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजीनामानाट्याचा कोणाला फायदा होईल हे लवकरच कळेल.
दरम्यान, राज्यात विविध ठिकाणी भाजपची अंतर्गत धुसफूस समोर येत आहे. तिकडे धुळ्यातही नेमकं महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे आमदार अनिल गोटे यांचं बंड समोर आलंय. भाजपने आपल्या नेतृत्त्वात निवडणूक लढवावी, अशी गोटेंची मागणी आहे. त्यामुळे धुळ्यातही भाजपची गोची झाली आहे.