जो येईल अंगावर त्याला घेवू शिंगावर…; विलासराव देशमुखांच्या लेकाने सभा गाजवली
Dhiraj Vilasrao Deshmukh Speech in Latur : काँग्रेस नेते धिरज देशमुख यांची काल लातूरमध्ये सभा झाली. या सभेला त्यांनी संबोधित केलं. तेव्हा मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर त्यांनी भाष्य केलं. तसंच भाजपवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर...
राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. लातूरमध्ये काँग्रेसची सभा झाली. लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार धिरज देशमुख यांनी लातूर तहसील कार्यालयात काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून रॅली काढण्यात आली. तसंच आयोजित सभेला धिरज देशमुख यांनी संबोधित केलं. गेल्या निवडणुकीत आपण पहिल्यांदा मला निवडून दिले. एक लाखाच्या फरकाने दिले होते. मी पुन्हा एकदा आपल्या समोर आहे. शेतकरी,महिला सुरक्षितता,रोजगार असे अनेक मुद्दे आहेत. जो येईल अंगावर त्याला घेवू शिंगावर…, असं धिरज देशमुख म्हणाले.
लातूर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून प्रचार शुभारंभ रॅली काढण्यात आली. लातूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं महाविकास आघाडीची सभा झाली. काँग्रेस पक्षाचे उमेदवार धिरज देशमुख यांनी यावेळी सभेला संबोधित केलं.
धिरज देशमुख काय म्हणाले?
आमदार धीरज देशमुख बोलत आहेत… लातूर कोणत्या विचाराने चालणार आहे, हे लोकांनी रॅलीने दाखवून दिले. लातूरमध्ये जे घडते ते राज्यात घडते. त्यामुळे महा विकास आघाडीचे सरकार येणार आहे. सुधाकर शृंगारे यांना खऱ्या अर्थाने स्वतंत्र मिळवून दिले आहे. भाजपने त्यांचे स्वतंत्र खंडित केले होते. त्यांचा फक्त वापर केला. भाजपची हीच पॉलिसी आहे. वापरा आणि फेकून द्या… शृंगारे यांना पाहून असे वाटते हमें तो अपनो ने लुटा गैरो मे कहा दम था… शृंगारे आता आपल्यासोबत आलेत. त्यांना काँग्रेसमध्ये सन्मान मिळेल, असा शब्द धिरज देशमुख यांनी दिला आहे.
धिरज देशमुखांचा शिंदे सरकारवर निशाणा
रोज एक नवीन घोषणा, आश्वासनांचा पाऊस पडतो आहे. मात्र आम्हाला आमच्या हक्काचे हवे आहे. आम्ही मराठवाड्याचे आहोत हे विसरायचे नाही. मराठवाड्याला पाणी मिळू दिले नाहीत. मराठवाड्याचा विकास होऊ दिला गेला नाही. अलीकडे जाहिरातींचा भडिमार सुरु आहे. 200 कोटी रुपये जाहिराती वर खर्च केले, याचे उत्तर या निवडणुकीत विचारा…, असं ते म्हणाले.