Sharad Pawar at Killari : किल्लारी भूकंपाला आज 30 वर्षे पूर्ण; गावकऱ्यांकडून शरद पवारांचा कृतज्ञता सोहळा
Sharad Pawar at Killari Today : शरद पवार आज किल्लारीत जाणार; क्रांतिकारी मैदानात शरद पवारांचा कृतज्ञता सोहळा पार पडणार आहे, लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात शरद पवारांचा सन्मान सोहळा पार पडणार आहे. किल्लारीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे.
किल्लारी, लातूर | 30 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज लातूरमध्ये जाणार आहेत. किल्लारी भूकंपाला आज 30 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे लातूरच्या किल्लारी या गावात शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. लातूरच्या किल्लारी गावात 1993 साली मोठा भूकंप झाला. यात हजारो लोकांचा मृत्यू झाला. लोकांनी आप्तेष्टांसह होतं नव्हतं ते गमावलं. या भूकंपावेळी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी तात्काळ किल्लारी गाठलं अन् लोकांना लवकरात लवकर मदत कशी पोहोचवली जाईल, याचं नियोजन केलं. या सगळ्यामुळे लोकांना आधार मिळाला. याचबद्दल कृतज्ञता म्हणून किल्लारीवासीयांनी शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे.
शरद पवार यांनी दिलेल्या तात्काळ सूचनांमुळे लोकांना लगोलग मदती मिळाली. त्यामुळे किल्लारीवासीय शरद पवारांचे आभार मानणार आहेत. आज सकाळी दहा वाजता किल्लारीतील क्रांतिकारी मैदानावर शरद पवारांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. काल दिवसभर शरद पवार बारामतीत होते. बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी काही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. विविध संस्थांच्या बैठका काल पार पडल्या त्यानंतर ते पुण्यात आले. पुण्यातील निवासस्थानातून थोड्याच वेळात शरद पवार लातूरसाठी निघणार आहेत. किल्लारी भूकंपग्रस्तांकडून शरद पवारांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
चलो किल्लारी…!!!
मराठवाड्यातील लातूर व धाराशिव जिल्ह्यात ३० वर्षांपूर्वी म्हणजेच ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंप झाला, आता या घटनेला ३ दशके पूर्ण होत आहेत. त्यावेळी, धावून गेला होता महाराष्ट्राचा सह्याद्री, जनहिताच्या सेवेला. मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ३०… pic.twitter.com/9qGjp1GRoY
— NCP (@NCPspeaks) September 29, 2023
शरद पवार यांनी या भूकंपाविषयीचा आपला अनुभव अनेक मुलाखतींमध्ये सांगितला आहे. ही राज्याची मोठी हानी होती. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या मेहनतीमुळे आणि लोकांच्या सहकार्यामुळे ते शक्य झालं, असं शरद पवार सांगतात.
शरद पवार सांगतात की, गणपती विसर्जनाचा तो दिवस होता. राज्यातील शेवटचा गणपती विसर्जित झाल्यानंतर मी झोपण्यासाठी गेलो. पण तितक्यात घराची खिडकी हलल्यासारखं वाटलं. तेव्हा वाटलं की कोयना धरणाच्या इथे कदाचित भूकंपाचे धक्के जाणवले असतील. म्हणून तिथे फोन केला. तर तिथे कळालं भूकंपाचं केंद्र हे कोयना नसून लातूरमधील किल्लारी आहे. मग तिकडे अधिकाऱ्यांशी बातचित केली अन् पहाटे लातूरसाठी निघालो. तिकडे पोहोचल्यानंतर अख्ख गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं होतं. तात्काळ प्रशासनाला सूचना केल्या.
जेव्हा लातूर दुर्घटनेचा उल्लेख होतो. तेव्हा एक व्हीडिओची नेहमीच चर्चा होते. तुमच्या घरातील लोक गेले तर लोकांना वाटतं आपल्या घरातील कुणी गेलं आहे. सणसूद करायची लोकांची इच्छा नाही, असं या व्हीडिओत शरद पवार म्हणतातना दिसतात. यात शरद पवार प्रशासनाला सूचना करताना दिसतात.
चलो किल्लारी…
३० सप्टेंबर १९९३ रोजी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात भूकंपामुळे किल्लारी गाव जमीनदोस्त होण्याच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. परंतु आव्हान कितीही मोठं असूदेत, मुळीच डगमगून जायचं नाही या बाण्याने पुढे सरसावले ते तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय… pic.twitter.com/B9TB624HHn
— NCP (@NCPspeaks) September 27, 2023