पहाटेचे पावणे चार वाजले होते, मी झोपायला जात होतो, इतक्यात…; शरद पवार यांनी किल्लारी भूकंपावेळीच्या आठवणी सांगितल्या
Sharad Pawar on Killari Earthquake : कुणीही पाहू नये, असं अशी परिस्थिती किल्लारीवर ओढावली होती; शरद पवार यांनी जुन्या आठवणी सांगितल्या. त्यांनी हा भूकंप झाला तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती. यावर भाष्य केलं. पवार म्हणाले, पहाटेचे पावणे चार वाजले होते, मी झोपायला जात होतो, इतक्यात...
लातूर | 30 सप्टेंबर 2023, सागर सुरवसे : किल्लारी भूकंपाला आज 30 वर्षे पूर्ण झाली. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. या भूकंपावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. किल्लारीला पुन्हा उभं करण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे किल्लारीवासीयांनी आज शरद पवार यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. इथे बोलताना शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आजचा दिवस हा अस्वस्थ करणारा दिवस आहे. या दिवसाच्या आठवणींनी आजही अंगावर शहारा येतो, असं म्हणत शरद पवार यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली.
राज्याचा मुख्यमंत्र्यावर अनेक जबाबदारी असतात. त्यातील एक दिवस म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस. राज्यातील शेवटचा गणपती विसर्जन होत नाही. तोपर्यंत मुख्यमंत्र्याला झोप लागत नाही. त्यादिवशी पावणे चार वाजता मी झोपायला गेलो आणि अंग टाकतो तोच माझ्या घराच्या खिडक्या हालल्या. माझ्या लक्षात आलं की, भूकंप झाला आहे. त्यामुळे मी आधी साताऱ्याला फोन केला. विचारलं की, कोयनेला भूकंप झाला आहे का? त्यावेळी मला त्यांनी सांगितलं की, भूकंप इथं नाही तर लातूर जिल्ह्यात झाला आहे. त्यानंतर मी लगेच विमानाची व्यवस्था केली. सोलापूरला येऊन किल्लारी गावात पोहोचलो, असं शरद पवारांनी सांगितलं.
कि्ल्लारीतील परिस्थिती अत्यंत बिकट होती. आयुष्यात कधीही पाहू नये असं हे संकट होतं. केवळ औसाच नव्हे तर उमरगा तालुक्यात आणि आसपास हीच स्थिती होती. ते चित्र पाहून आम्ही तात्काळ सर्व मदतकार्य सुरु केलं, असं शरद पवार म्हणाले.
सकाळी 7 ला उठून रात्री दोन तीन वाजेपर्यंत काम करायचे. पुन्हा मुक्कामी सोलापूरला जायचे. असं हे अधिकारी काम करत होते. मला समाधान वाटतं की, एवढे मोठे संकट येऊनही दोन तीन जिल्ह्यातील लोकांनी अतिशय धैर्याने लढा दिला. विलासराव देशमुख, पद्मसिंह पाटील आणि जिल्हाधिकारी प्रविणसिंह परदेशी यांनी खूप काम केलं. मला आठवते की, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बैलगाडीत एक व्यक्ती झोपलेली होती. मी त्याना उठवून विचारले तेव्हा लक्षात आलं की, ते जिल्हाधिकारी प्रविणसिंह परदेशी होते. या सगळ्या लोकांनी झोकून देऊन काम केलं, असंही शरद पवार म्हणाले.