किल्लारी, लातूर | 30 सप्टेंबर 2023 : किल्लारी… महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एक गाव. दिवस होता 30 सप्टेंबर 1993 चा. गणपती विसर्जनाचा हा दिवस… गणपती विरर्जन झाल्यानंतर हे गाव गाढ झोपी गेलं होतं. अख्खं गाव साखर झोपेत असताना पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी अचानक हादरे जाणवायला लागले. पुढे काहीच वेळात होत्याचं नव्हतं झालं. घरंच्या घरं जमीनदोस्त झाली. हजारो लोकं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. हजारो लोकांनी आपला जीव गमावला. हजारो जनावरांचा मृत्यू झाला. या घटनेचा उल्लेख आला की आजही अंगावर शहारा उभा राहतो.
लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात 30 सप्टेंबर 1993 मोठा भूकंप झाला. या भूकंपाचं केंद्र होतं, सोलापूरच्या ईशान्येला 70 किमी अंतरावरचं किल्लारी गाव. पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी अचानक हादरे जाणवले. 6. 4 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. या भूकंपात 7 हजार 928 लोकांनी आपला जीव गमावला. 16 हजार लोक जखमी झाले. तर 15 हजार 854 जनावरं मृत्यूमुखी पडली. हा भूकंप केवळ किल्लारी पुरता मर्यादित नव्हता. तर लातूर आणि उस्मानाबादच्या 52 गावांवर त्याचा प्रभाव पडला. 30 घरं जमीनदोस्त झाली. तर 13 जिल्ह्यातील 2 लाख 11 हजार घरांना तडे गेले. लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबादमधील उमरगा तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला. लोकांनी आपलं अन् सारं सारं गमावलं.
एवढा मोठा भूकंप झाल्यानंतर आणि आप्तेष्टांना गमावल्यानंतर स्थानिकांनी टाहो फोडणं सहाजिक होतं. किल्लारीसह आजूबाजूच्या परिसरात लोकांच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या आप्तेष्टांना लोक शोधत होते. अचानकपणे कोसळलेला दु:खचा डोंगर लातूरवासीयांसह अवघा महाराष्ट्र दु:खात बुडाला.
महाराष्ट्र दु:खात असताना देशातून आणि परदेशातूनही मदत आली. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांची महत्वाची भूमिका राहिली. लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं. आज या भूकंपाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रावर आघात करणाऱ्या भूकंपाची जखम आजही भळभळती आहे. आजही या भूकंपाची उल्लेख आला की, अंगावर शहारा येतो. आजही किल्लारीच्या नागरिकांना गहिवरून येतं.