Sahitya Sammelan | 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सासणे बिनविरोध
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथाकार आणि लेखक भारत सासणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.
नाशिकः उदगीरमध्ये होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथाकार आणि लेखक भारत सासणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. यापूर्वी नाशिकमध्ये गेल्याच महिन्यात 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी खगोलतज्ज्ञ जयंत नारळीकर होते.
तारखाही आज होणार घोषित
नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन अनेक वादविवादांनी गाजले. मग त्या साहित्य संमेलनाच्या तारखा असो की, साहित्य संमेलनाचे बदललेले स्थळ. आता 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडीसाठी आज रविवारी उदगीरमध्ये बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. ठाले-पाटील म्हणाले की, सध्या अध्यक्षाचे नाव घोषित केले आहे. थोड्यात वेळात अजून एक बैठक घेऊन तारखांची घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दमदार कथालेखक
भारत सासणे हे मराठीतील एक महत्त्वाचे कथाकार म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 27 मार्च 1952 रोजी जालना येथे झाला. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्सीचे शिक्षण पूर्ण केले. विविध शासकीय अधिकारी म्हणून काम केले. विशेषतः 1980 नंतरचा एक दमदार कथालेखक म्हणून त्यांची ओळखय. नवकथेची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यातून आपला वेगळा, स्वतंत्र बाज निर्माण करणारी कथा लिहिली. पारंपरिकता व प्रयोगशीलता यांचे मिश्रण त्यांच्या कथांमध्ये आढळते. त्यांच्या कथांतून व्यक्तीच्या आत्मशोधाच्या प्रक्रियेचे चित्रण जसे आढळते, तसेच स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षणामागचे गूढ, तरल, सूक्ष्म मनोव्यापारही ते कौशल्याने उलगडतात.
अनेक पुरस्कार, सन्मान
भारत सासणे यांना लेखनाबद्दल राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार, तसेच इतरही मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत. सासणे हे वैजापूरला 4 एप्रिल 2010 रोजी झालेल्या 5 व्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते. बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे वसमत येथे 9-10 नोव्हेंबर 2014 या काळात आयोजित केलेल्या 35 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे 14 फेब्रुवारी 2016 रोजी भरलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदीही ते होते. सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे समारोपीय सत्राचे अध्यक्ष पद त्यांनी भूषवले आहे. सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने समग्र साहित्य सेवेबद्दल त्यांना सूर्योदय पुरस्कार देवूनही गौरवण्यात आले आहे.
सासणे यांची साहित्य संपदा
– जॉन आणि अंजिरी पक्षी (पहिला कथासंग्रह) – विस्तीर्ण रात्र (दीर्घकथा संग्रह) – शुभ वर्तमान (कथासंग्रह) – सटवाईचा लेख (पाच भागात वाटल्या गेलेल्या लेखांचा संग्रह) – स्यमंतक मण्याचे प्रकरण (कथासंग्रह) – क्षितिजावरची रात्र (दीर्घकथा संग्रह) – अदृष्ट (दीर्घकथा संग्रह) – अनर्थ रात्र (दीर्घकथा संग्रह) – अस्वस्थ (दीर्घकथा संग्रह) – आतंक (दोन अंकी नाटक) – आयुष्याची छोटी गोष्ट (कथासंग्रह) – ऐसा दुस्तर संसार (दीर्घकथा संग्रह) – कॅंप/बाबींचं दुःख (दीर्घकथा संग्रह) – चल रे भोपळ्या/हंडाभर मोहरा (मुलांसाठी दोन नाटिका) – चिरदाह (दीर्घकथा संग्रह) – जंगलातील दूरचा प्रवास (मुलांसाठी कादंबरी) – चिरदाह (दीर्घकथा संग्रह) – त्वचा (दीर्घकथा संग्रह) – दाट काळा पाऊस (दीर्घकथा) – दूर तेव्हा तेथे दूर तेव्हा/सर्प (दोन कादंबरिका) – दोन मित्र (कादंबरी) – नैनं दहति पावकः – बंद दरवाजा (कथासंग्रह) – मरणरंग (तीन अंकी नाटक) – राहीच्या स्वप्नांचा उलगडा (कादंबरी) – लाल फुलांचे झाड (कथासंग्रह) – वाटा आणि मुक्काम (सहलेखक – आशा बगे, मिलिंद बोकील, सानिया)
इतर बातम्याः
Nashik| अजब तुझे सरकार…अन् मृत ग्रामसेवकाच्या नावावरची 28 लाखांची वसुली टळली…!