तीन पोलिसांचे निलंबन, पोलीस निरीक्षकाची बदली, काय आहे प्रकरण?
मात्र चार दिवस उलटले तरी पोलिसांनी काहीच कार्यवाही केली नाही. गिरिधारी तपघाले हे दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर रेणापूर इथं घरी पोहचले. त्यानंतर पुन्हा आरोपींनी तपघाले यांच्या घरी येऊन पैश्यांच्या वसुलीसाठी बेदम मारहाण केली.

प्रतिनिधी, लातूर : रेणापूर येथील मजूर गिरिधारी तपघाले (वय ४८) यांनी तीन हजार रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज गावातल्याच एका व्याजीबट्टी करणाऱ्या व्यक्तीकडून कौटुंबिक गरज पूर्ण केली.या तीन हजार रुपयांचे चक्रदरवाढ व्याजाने लक्ष्मण मरकड हा वीस हजार रुपये दे म्हणून तगादा लावत होता. या पैश्यांच्या वसुलीसाठी गिरिधारी तपघाले यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जखमी झालेले तपघाले हे तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी पोलिसांनी फिर्याद घेतली नाही. तुम्ही अगोदर उपचार घ्या. दवाखान्यात येऊन आम्ही जवाब घेतो. गुन्हा दाखल करतो असे सांगितले होते.
पैशाच्या वसुलीसाठी मारहाण
मात्र चार दिवस उलटले तरी पोलिसांनी काहीच कार्यवाही केली नाही. गिरिधारी तपघाले हे दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर रेणापूर इथं घरी पोहचले. त्यानंतर पुन्हा आरोपींनी तपघाले यांच्या घरी येऊन पैश्यांच्या वसुलीसाठी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तपघाले यांना पुन्हा दवाखान्यात हलवावे लागले होते.
उपचारादरम्यान मृत्यू
यावेळी उपचारादरम्यान गिरिधारी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी वेळीच कार्यवाही केली असती तर प्रसंग टाळता आला असता. असा आरोप तपघाले कुटुंबीयांनी करीत पोलिसांवर कार्यवाहीची मागणी केली. त्यानुसार पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी प्रकरणाची चौकशी करीत दोषी आढळलेल्या पोलीस निरीक्षक आणि इतर तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.
तीन पोलिसांचे निलंबन
लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर येथील पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. तीन हजार रुपयांसाठी मजुराची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
या घटने प्रकरणी हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक दीपक शिंदे यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. तर, इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.