Prashant Koratakar : “ए पश्या… कोरटकरवर हल्ला करणाऱ्या वकिलाने काय सांगितलं ?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणारा तसेच इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आणि पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. त्याच्यावर कोर्टाच्या आवारात हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणारा तसेच इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आणि पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. काल ( 28 मार्च) त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता पोलीस कोठडीची मुदत दोन दिवसांनी वाढवली. मात्र, त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर पडत असतानाच त्याच्यावर एका वकिलाने काल कोरटकर याच्यावर झडप घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मोठी खळबळ माजली. झप घालणारा वकील, ॲड. अमितकुमार भोसले याला पोलिसांनी लागलीच ताब्यातही घेतले होते. आता त्याच वकिलाची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘ माझ्या भावना अनावर झाल्याने मी कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न केला. मी वकील असलो तरी त्याआधी मी शिवप्रेमी आहे, छत्रपती घराण्याचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही’ असे म्हणत भोसले यांनी त्यांची भूमिका मांडली.
कोरटकर सारखी विषारी प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे
ॲड. अमितकुमार भोसले यांना त्यांच्या कृत्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी स्पष्टपणे आपली भमिका मांडली. प्रशांत कोरटकर अचानक समोर आला त्यावेळी माझ्या भावना अनावर झाल्या आणि मी त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मी वकील आहे, मात्र वकील होण्याआधी मी एक शिवप्रेमी आहे. छत्रपती घराण्याचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही असे ते म्हणाले. कोरटकरसारखी विषारी प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे. आधी जेम्स लेन, त्यानंतर भगतसिंह कोशारी, मग राहुल सोलापूरकर आणि आता हा प्रशांत कोरटकर विष पसरवणारी अशी प्रवृत्ती वाढत आहे, ती नष्ट झाली पाहिजे. प्रशांत कोरटकर हा न्यायाधीश आणि पोलिसांच्या समोर उभा राहण्याच्या देखील लायकीचा नाही, त्याला जनतेच्या ताब्यात त्याचा कडेलोट आम्हीच करतो, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
माझ्या कृत्याचा केस वर कोणताही परिणाम होईल असं वाटत नाही कारण सरकारी वकील आणि असेम सरोदे आपली बाजू योग्य पद्धतीने मांडत आहेत योग्य युक्तिवाद करत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांना मोकळीक द्या. त्यांच्यावर दबाव आणू नका. पोलिसच अशा प्रवृत्त्ती ठेचून काढतील, असेही भोसले म्हणाले. पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला असला तरी हे त्यांचे काम करत आहेत. त्याबद्दल मला कुठलाही आक्षेप नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नेमकं काय झालं ?
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरवर काल कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या आवारातच हल्ल्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे, हा हल्ला एका वकिलानेच केला, संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ समोर आला. मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आले असतानाही हा प्रकार घडला. मात्र, पोलिसांनी वेळीच वकिलाला ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनुचित प्रकार टळला. काल पोलीस कोठडी संपल्याने कोरटकरला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा न्यायालयाने कोरटकरची पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवण्याचा निर्णय दिला. मात्र, सुनावणी संपल्यानंतर, वकील अमित कुमार भोसले हे अचानक कोरटकरच्या दिशेने धावले. “ये पश्या… छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतोस का?” असे ओरडत त्यांनी कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमुळे कोर्ट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून वकिलाला रोखले आणि ताब्यात घेतले. तो हल्ला करणाऱ्या वकिलांनी आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचेच एका अर्थी त्यांच्या विधानातून सांगितलं आहे.