मळभ दूर… अखेर महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा; शपथविधी उद्याच!
उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी आता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र नव्या सरकारच्या शपथविधीसाठी वेळ लागत असल्यानं नव्या मंत्रिमंडळाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर उद्या मुंबईतल्या आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यापूर्वी महायुतीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. आज भाजपकडून विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सर्वानुमते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. 132 जागा जिंकून भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे मुख्यमंत्री देखील भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नीवड झाल्यानं तेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
दरम्याान भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नीवड झाल्यानंतर आता वेगानं घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुतीमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक वर्षावर पार पडली. या बैठकीनंतर आता राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. संख्याबळासाठी आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यापालांना देण्यात आलं आहे. देवेंद्र फडणीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
उद्या शपथविधी
उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल 22 राज्यातील मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल चाळीस हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान महायुतीच्या नव्या सरकारामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा जुनाच पॅटर्न कायम राहणार आहेत. उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार आहेत. मात्र त्यांच्यासोबत आणखी कोण -कोण मंत्रिपदाची शपथ घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.