निवडणुकीत एआय (AI) मुळे वाढले नेत्यांचे टेन्शन, फेक ऑडिओ, व्हिडिओचे ठरताहेत बळी
आगामी लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते लोकांमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. मात्र, निवडणुकीपूर्वी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) राजकीय पक्ष आणि नेत्यांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरली आहे.
नवी दिल्ली | 12 मार्च 2024 : गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सोव्हिएत रशियामध्ये निवडणुक झाल्या. येथील प्रोग्रेसिव्ह स्लोव्हाकिया पक्षाचे नेते सिमेका हे निवडणुकीत पराभूत झाले. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे निवडणुकीआधी दोन दिवस त्यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सिमेका हे या व्हिडीओमध्ये निवडणूक जिंकल्यास बिअरची किंमत दुप्पट करू असे म्हणतान दिसत होते. वास्तविक, सिमेका यांनी अशी कोणतीही घोषणा केली नव्हती. ही सर्व करामत होती AI तंत्रज्ञानाची. त्या बनावट व्हिडिओचे सत्य लोकांपर्यंत पोहोचण्याआधीच सिमेका आणि त्यांच्या पक्षाचे मोठे नुकसान झाले होते. ही घटना दूरच्या देशामधील असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीतही अशाच पद्धतीचा खोटा प्रचार होण्याची भीती सर्वच राजकीय पक्षांना वाटत आहे.
भारतात राजकीय पक्ष आणि नेत्यांभोवती डीपफेकचा धोका वाढत चालला आहे. याची अनेक प्रकरणे येथेही समोर आली आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट, मोबाईल, अॅप्स यांनी प्रचार माध्यमांना गती दिली. निवडणुकीत तळपत्या उन्हापासून नेत्यांचे काही प्रमाणात संरक्षण केले. मात्र, आता याच तंत्रज्ञानाचे तोटेही समोर येऊ लागले आहेत. आतापर्यंत फोटो किंवा व्हिडीओ छेडछाड केल्याची प्रकरणे समोर येत होती. पण, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (AI) या फसवणुकीला इतके बारकावे दिले आहेत की हे सर्व अगदी खऱ्या गोष्टींसारखेच दिसते.
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्रीही ठरले डीपफेकचे बळी
तेलंगणात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी बीआरएस पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचाही एक डीपफेक व्हिडिओ तयार करण्यात आला होता. ज्यामध्ये राव हे काँग्रेसला मतदान करण्यास सांगत होते. या डीपफेक व्हिडिओची बीआरएसने पोलिसात तक्रारही दाखल केली होती.
राजस्थानमध्ये झालेल्या निवडणुकीतही मतदारांना आकर्षित करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या आवाजाचा फेक ऑडिओ तयार करण्यात आला होता. व्हॉट्सॲपद्वारे मतदारांना नावाने कॉल करण्यासाठी एआयचा वापर करण्यात आला होता.
मतदारांना भ्रमित करण्यासाठी डीपफेकचा वापर
वरील काही घटना लक्षात घेता असे दिसून येते की निवडणुकांमध्ये विरोधकांना हानी पोहोचवण्याच्या किंवा मतदारांना त्यांच्या बाजूने आकर्षित करण्याच्या हेतूने डीपफेकचा वापर झपाट्याने होत आहे. अशावेळी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या म्हणजेच भारताच्या निवडणुका डीपफेक्सपासून दुर ठेवता येणे अशक्य वाटत आहे.
कोणत्याही निवडणुका या मुद्द्यावरून, उमेदवाराची समाजामधील प्रतिम यावरून लढविल्या जातात. मात्र, या दोन्ही गोष्टी नष्ट करण्याची क्षमता डीपफेकमध्ये आहे. भारतामध्ये 90 कोटींहून अधिक मतदार आहेत. यातील जवळपास 80 टक्के मतदारांकडे इंटरनेट सक्षम मोबाइल फोन आहेत. अशावेळी डीपफेकची भीती अधिक प्रमाणात आहे. मतदानाला काही तास शिल्लक असताना असे डीपफेक ऑडिओ किंवा व्हिडिओ व्हायरल झाल्यास त्याचा फटका उमेदवारांना बसणार हे निश्चित आहे. उमेदवार नंतर खुलासे देईल पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.