बाप-लेकीला सोडून दादांसोबत चला, शरद पवार गटाच्या खासदारांना तटकरे यांचा सल्ला?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटात पुन्हा एखादा खळबळ सुरु झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातील खासदारांना अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांनी आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणूकात मोठे यश मिळाले आहे. आता अजितदादा पवार यांच्या गटातील नेते सुनील तटकरे यांनी हिवाळी अधिवेशनात शरद पवार गटातील खासदारांना ‘बाप आणि लेकीला सोडून दादांसोबत चला’ असा सल्ला दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यावरुन पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सोडून इतर सर्व खासदारांना सुनील तटकरे यांनी हा प्रस्ताव पाठविल्याचे म्हटले जात आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विविध स्वरुपाच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.
‘बाप आणि लेकीला सोडून दादांसोबत चला
शरद पवार यांच्या गटात फूट पडल्यानंतर अजितदादांना काकांची साथ सोडून महायुतीत प्रवेश केला. त्यानंतर लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला फारसे यश मिळाले नाही. त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा देखील सुप्रिया सुळे यांनी पराभव केला. मात्र, विधानसभा निवडणूकीत राष्ट्रावादी अजित पवार गटाला अपेक्षेपेक्षा जादा असे दणदणीत ४१ आमदार मिळाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांनी अजितदादांनी नवीन जबाबदारी सोपविली आहे. शरद पवार गटातील खासदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी अजित पवार यांनी तटकरे यांना ही जबाबदारी दिली आहे. ‘बाप आणि लेकीला सोडून दादांसोबत चला’ असा प्रस्ताव सुनील तटकरे यांना मांडण्यास अजितदादांनी सांगितल्याचे म्हटले आहे.
नितीश कुमार यांना धाकात ठेवण्यासाठी
या संदर्भात राष्ट्रवादी गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकीकडे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत अशी चर्चा सुरु आहे. परंतू तसे असते तर सुनील तटकरे यांनी आमच्या खासदारांना आकृष्ट करण्यासाठी असा प्रकार केला नसता असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे यांना शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेले नको आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या खासदारांना असे फोन केले आहेत असे आव्हाड यांनी म्हटले आहे. परंतू तुम्ही आमचा पक्ष पळवला आणि निशाणी देखील नेली, आता आमचे खासदारही नेण्याचा तुमचा प्रयत्न आहे. त्यांनी आमच्या खासदारांना फोन केले परंतू त्यांची ऑफर आम्ही धुडकावली आहे. सगळ्यांनीच तुमच्याप्रमाणे कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळलेले नाही. हा सगळा प्रकार एनडीएत नितीश कुमार यांना धाकात ठेवण्यासाठी केला जात आहे. ओ देखो शरद पवार आ रहे है, ओ देखो उद्धव ठाकरे आ रहे अशा धमक्या नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी देत आहेत असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
आम्ही अजितदादांकडे पाहातो
केंद्रात काटाचे बहुमत असलेल्या एनडीएला आपले निर्णय दामटवण्यासाठी बहुमत हवे आहे. त्यात नितीश कुमार कधीही साथ सोडतील अशी स्थिती आहे. त्यामुळे केंद्रात मंत्री पद मिळण्याच्या लालसेने तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी ही खेळी केलेली आहे असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सुनील तटकरे स्वत:च्या ताकदीवर डील करीत आहेत की कोणाच्या सांगण्यावरुन हे डील करीत आहेत हे आपल्याला माहिती नाही. परंतू राष्ट्रवादीत आम्ही अजितदादांकडे पाहातो. जोपर्यंत त्यांच्या तोंडून याबाबत काही खुलास होत नाही तोपर्यंत आम्ही तटकरे यांना त्यांचा पाठिंबा आहे असे मानणार नाही असे राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी म्हटले आहे.