Loksabha Election 2024 : भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले
मुंबईतील भांडूप येथे गोंधळ माजल्याचे दिसून आले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते डमी मशीनवर मतदानासंदर्भात मार्गदर्शन करत होते. मात्र त्याला आक्षेप दर्शवत पोलिसांनी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि गदारोळ माजला
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज असून मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 जागांवर मतदान होत आहे. सकाळपासून सेलिब्रिटी, नेते मंडळी तसेच राज्यातील नागरिकांनीही मतदानासाठी रांगा लावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. मात्र याचदरम्यान मुंबईतील भांडूप येथे गोंधळ माजल्याचे दिसून आले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते डमी मशीनवर मतदानासंदर्भात मार्गदर्शन करत होते. मात्र त्याला आक्षेप दर्शवत पोलिसांनी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि गदारोळ माजला.
यामुळे संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत भलतेच आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांना जाब विचारला. आज सकाळी संजय राऊत आणि सुनील राऊत मतदानासाठी बाहेर पडले, पण कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे पाहून ते संतापले आणि पोलिसांना जाब विचारला. त्यामुळे वातावरण तापले होते.
मतदान केंद्रावर ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे डमी मशीनचं प्रात्यक्षिक दाखवत होते. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि गाडीत बसवले. हे लक्षात येताच राऊत यांनी पोलिसांना या कारवाईबाबात प्रश्न विचारले. आमचे कार्यकर्ते मतदान केंद्रापासून 100 मीटर बाहेर अंतरावर होते, टेबलवर नागरिकांना मार्गदर्शन करत होते, मग त्यांना ताब्यात का घेतले असा सवाल पोलिसांना विचारला. आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे, त्यांना धमकी दिली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. भाजपला पराभव दिसू लागला आहे, म्हणून पोलिसांवर जबाव आणला जातोय, अशी टीका त्यांनी केली.
संजय राऊतही संतापले
दरम्यान पोलिसांच्या या कारवाईवर संजय रऊत यांनीही नाराजी व्यक्त केली. प्रचंड पैशांचे वाटप केले जात आहे. त्यावर काही कारवाई केली जात नाही. निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाची शाखा म्हणून काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाची अशी कोणतीही नियमावली नाही. मार्गदर्शन करण्यासंदर्भात काही नियमावली नाही. तरीही काही लोकांनी पोलिसांवार, अधिकाऱ्यांवर दादागिरी करत आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली. पोलीस त्यांना घेऊन गेले. पण जे पैसे वाटप करत होते, त्यांना अटक केली नाही. पण तुमचा दबाव, तुमच्या पैशाचे वाटप झुगारुन लोकांनी मतदान केले आहे, हे 4 जून नंतर त्यांना समजेल असे राऊत म्हणाले.