अमित शाहांचे सत्य शेवटी बाहेर आले… वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की हे विधेयक मुस्लिम संपत्तीवर कब्जा मिळवण्यासाठी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कथनातून स्पष्ट झाले आहे की या विधेयकाचा उद्देश संपत्तीची खरेदी-विक्री करणे हा आहे, असे संजय राऊत म्हणाले.

लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. काल मध्यरात्री वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयकाच्या समर्थनात 288 मतं पडली. तर विरोधात 232 मतं पडली. त्यामुळे लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक मंजूर करण्यात आले. दुपारी 12 वाजता सादर केलेल्या या बिलावर रात्री उशीरापर्यंत मोठा गोंधळ सुरु होता. अखेर वक्फ सुधारणा विधेयकाच्या समर्थनात 288 मतं पडल्यानंतर वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केलं. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक मंजूर झाल्यानंतर केंद्र सरकारवर टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सत्य शेवटी बाहेर आले. आता ते त्या जागेची खरेदी विक्री करणार, असे संजय राऊतांनी म्हटले.
“हा व्यवहार मुस्लिमांच्या संपत्तीवर कब्जा मिळवण्यासाठी”
“उद्धव ठाकरे याबद्दल पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहेत. त्यात ते शिवसेनेच्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती दिले. काल पहाटे हे वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले. जणू काही देशात फार मोठी क्रांती करतात, अशाप्रकारचा माहोल सरकारने आपल्या सर्वांच्या माध्यमातून निर्माण केला. हे बिल मंजूर झालं आणि आपले पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेले. या बिलामुळे या देशात काय होणार आहे आणि यापूर्वी काय झालं आहे, हा सर्व व्यवहार हा मुस्लिमांच्या संपत्तीवर कब्जा मिळवण्यासाठी आहे. यात फार मोठं महान कार्य, गरीब मुस्लिम लोकांचा उद्घार होणारं असं ते जे काही भाष्य करतात ते पूर्णपणे ढोंग आहे. अडीच लाख कोटीच्या वर ज्या प्रॉपर्टीचे मूल्य आहे. अशा प्रॉपर्टीवर आपला अधिकार राहावा यासाठी काल हा खेळ झाला”, असे संजय राऊत म्हणाले.
“शेवटी खरेदी विक्री वर ते आले”
“अल्पसंख्याक, मुस्लिम लोक, त्यांच्या महिला यांचा उद्धार कसा होणार आहे. काल अमित शाहांच्या यांच्या पोटातून एक सत्य बाहेर आलं. २०२५ पर्यंतच्या मशिदी, दर्गे, मदरसे याला ते हात लावणार नाहीत. पण रिक्त जमिनीची विक्री करु आणि त्या पैशातून आम्ही गरीब मुस्लिम महिलांना दान देऊ. म्हणजे शेवटी खरेदी विक्री वर ते आले आहेत. शेवटी हे संपत्तीचे रक्षणकर्ते आहेत ना, आम्ही तुमच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी हा कायदा आणला असेल, तर काल नकळत त्यांच्या तोंडातून एक सत्य बाहेर पडलं”, असेही संजय राऊतांनी म्हटले.