Maharashtra Lok Sabha Election 2024 : तुम्ही ठरवलं तरच बदल घडेल – अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
महाराष्ट्रातही आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत असून राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळपासूनच लोकांनी मतदानासाठी रांगा लावायला सुरूवात केली असून सुप्रिसद्ध अभिनेता सुबोध भावे यानेही पुण्यात मतदानाचे कर्तव्य पार पाडले.
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता जोरात सुरी असून आज 13 मे रोजी देशभरात अनेक राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. महाराष्ट्रातही आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत असून राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळपासूनच लोकांनी मतदानासाठी रांगा लावायला सुरूवात केली असून सुप्रिसद्ध अभिनेता सुबोध भावे यानेही पुण्यात मतदानाचे कर्तव्य पार पाडले. सुबोध भावे आणि त्याच्या पत्नीने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्याने जास्तीत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. सध्याच्या राजकारणावर काहीही बोलणं मात्र त्याने टाळलं.
तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकेल..
अभिनेता सुबोध भावे याने पुण्यातील सिटी पोस्ट जवळील मतदान केंद्रावर पत्नीसह मतदानाचे कर्तव्य पार पडले. त्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला. ‘ आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा मतदान करायला मिळालं तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला होता. तेव्हापासून कुठलीही निवडणूक असली तरीही मी आणि माझ्या घरातले सर्वजण मतदान करतो, कोणतेही मतदान आम्ही बुडवत नाही. मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे, याची जाणीव आम्हाला आहे. जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा असं मी मतदारांना आवाहन करीन, कारण तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकेल’ असे सुबोध भावे याने सांगितले.
महाराष्ट्रात कुठल्या 11 मतदारसंघात मतदान?
लोकसभा निवडणूका 2024 चा ज्वर चांगलाच वाढला आहे. एकमेकांना राजकीय पक्ष चिखल फेक करीत असून शिक्षण, महागाई, बेरोजगारी हे मुद्दे बाजूला पडले असून पाकिस्तान, मुस्लीम लांगुलचालन, मंगळसूत्र, वंशभेद आणि रंगभेद अशा मुद्द्यांवर निवडणूक पोहचली आहे. देशभरात निवडणूकीचे तीन टप्पे पार पडले आहेत. आज (13 मे) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदानास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 11 जागांवर या तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. यामध्ये जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नंदूरबार, अहमदनगर, शिर्डी या 11 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. अनेक दिग्गजांचं भवितव्य आज इव्हिएममध्ये बंद होणार आहे.
मावळ मध्ये तिरंगी लढत
मावळ लोकसभेसाठीही आज मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजताच मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा दिसून येत आहे. अनेक नागरिकांनी मतदान करत आपलं कर्तव्य पार पाडलं. मावळ लोकसभेसाठी एकूण 33 उमेदवार रिंगणात आहेत तर प्रमुख पक्षाचे तीन उमेदवार समोरासमोर आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेसाठी तिरंगी लढत होणार आहे. महाविकास आघाडी कडून संजोग वाघेरे, महायुती कडून श्रीरंग बारणे,वंचित कडून माधवी जोशी अशी थेट लढत होणार आहे.