बारामतीच नव्हे ‘या’ मतदारसंघातही प्रतिष्ठा पणाला; फडणवीस आणि पवार यांच्या खेळीकडे लक्ष
बारामती लोकसभा मतदारसंघ जितका पवार कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे. तितकाच माढा हा मतदारसंघही शरद पवार यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. शरद पवार यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळे बारामतीनंतर या मतदारसंघाला महत्त्व आलं आहे. काय आहे या मतदारसंघातील गणित? कुणी कसं जाळं टाकलंय? त्याचाच घेतलेला हा आढावा.
यंदा बारामतीत चुरशीची लढत होताना दिसत आहे. पण राज्यात बारामतीच नव्हे तर माढ्यातही तितकीच चुरशीची लढत होताना दिसत आहे. माढ्यात विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध होता. मोहिते पाटील आणि निंबाळकर घराण्याने त्यांना विरोध केला. तरी भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांचं तिकीट कायम ठेवलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय नेते अशी ओळख धैर्यशील मोहिते पाटलांची होती. मोहिते पाटील या जागेसाठी इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी फडणवीस यांच्या अनेक गाठीभेटी घेतल्या. यावेळी फडणवीस त्यांची समजूत काढण्याच्या प्रयत्न केला. मात्र तिकीट मिळणार नसल्याची खात्री धैर्यशील मोहितेंना झाली, त्यांनी तुतारी हाती घेतली. पवारांसाठी माढा बारामती इतकाच महत्त्वाचा आहे. पश्चिम महाराष्ट्रावर होल्ड ठेवण्यासाठी तो मतदारसंघ गरजेचा आहे. दुसऱ्या बाजूला फडणवीस पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेत. त्यामुळेच माढ्याची लढतही चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
माढ्यातून भाजपची उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा धैर्यशील मोहितेंना होती. निंबाळकर आणि मोहिते पाटलांचं भाजप पक्षांतर्गतच गटातटाचं राजकारण सुरु होतं. तरी फडणवीसांनी यात कुणा एकाची बाजू घेतली नाही. फडणवीस धैर्यशील मोहितेंची समजूत काढण्याचे पूर्ण प्रयत्न करत होते. मात्र नाराज मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतली. मोहितेंना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न शरद पवार करत होते. मात्र, ऐनवेळी भाजप उमेदवार बदलेल. आपल्या नाराजीची दखल घेईल, अशी खात्री मोहिते पाटलांना होती. शेवटी मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांची मोठी ताकद आहे. 2009 ला पवारांना लोकसभेत पाठवणारा हाच मतदारंसघ आहे. 2014 ला खुद्द पवारांनीही मोहिते पाटलांच्याच ताकदीमुळं माघार घेतली होती.
एका दगडात तीन पक्षी
बारामतीत होणारी लढत ही काका विरुद्ध पुतण्या अशी आहे. माढ्यात मात्र पवार विरुद्ध फडणवीस असा थेट सामना होतो आहे. मविआचं सरकार स्थापून फडणवीसांना पवारांनी चेकमेट केलं होतं. फडणवीसांनी महायुतीचं सरकार स्थापलं, पवारांच्या चालीची सव्याज परतफेड केली. आता माढ्यात टशन आहे. दोन्ही नेत्यांना चाणाक्य हे बिरुद लावलं जातं. त्यामुळं माढा जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचं आव्हान आणि संधी एकत्रितरित्त्या दोघांसमोर आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा पक्षविस्तार महत्त्वाचा आहे. राजकीय घराण्यांऐवजी थेट पक्षाचं अस्तित्त्व वाढवणं गरजेचं आहे. माढा हा सातारा, सोलापूर आणि बारामती या तिन्ही मतदारसंघावर प्रभाव टाकतो. माढा लोकसभेच्या माध्यमातून एकूण तीन लोकसभा जागांसाठीची लढाई सुरु आहे.
उत्तमराव जानकरांना पर्याय
धैर्यशील मोहिते पाटलांच्या बंडानंतर भाजपला नवा धक्का बसला. उत्तम जानकरांनी वेगळी भूमिका घेतली. माळशिरसच्या राजकारणात उत्तम जानकर हे मोठं नाव आहे. ते ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक होते. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून त्यांना खासदारकी लढवायची आहे. आता त्यांनी वाट बदलली आहे. इतिहास पाहिला तर मोहिते-पाटील ज्या पक्षात असतील, दुसऱ्या पर्यायी पक्षात जाऊन जानकर लढत आलेत. यात त्यांनी यापूर्वी कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस अशा पर्यायी पक्षांचा आधार घेतल्याचे दिसून येते. मागील माळशिरस राखीव विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राम सातपुते यांच्या विरोधात जानकर यांनी राष्ट्रवादीकडून कडवी झुंज दिली होती. त्यावेळी सातपुते हे अवघ्या अडीच हजारांच्या आघाडीने कसेबसे विजयी झाले होते. उत्तम जानकर हे धनगर समाजातून येतात. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये जवळपास अडीच ते तीन लाखाच्या धनगर वोटिंग आहे. अशात फडणवीसांनी माळशिसरचे कार्यकर्ते चार्ज केलेत. ते उत्तमराव जानकरांविरोधात मतं घेत आहेत. म्हणजे नेते तुतारीसोबत गेले, मात्र कार्यकर्ते भाजपसोबत आहेत.
गटतट बाजूला
माढ्याच्या विजयासाठी फडणवीसांनी सर्व शक्यता चाचपल्या असल्याचं दिसून येतं. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही मैदान मारण्यासाठी कंबर कसलेली आहे. महायुतीतल्या गटातटाच्या राजकारणाला मुठमाती देण्याचा संदेश दिला आहे. फडणवीसाच्या आव्हानाला प्रतिसाद मिळतो आहे. माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि प्राध्यापक शिवाजी सावंत चर्चेत आलेत. इथं दोघांचे राजकीय गट आहेत. गेल्या 25 वर्षापासून ते एकमेकांचे विरोधक राहिलेत. आपलं राजकारण वाढवण्यासाठी नेहमी ते वेगवेगळ्या पक्षात राहिले. आता मात्र महायुती म्हणून त्यांना एकत्र यावं लागतंय. भाजपासाठी ही युती फायद्याचीच ठरणारंय. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपाकडून विरोधकांना एकत्रीत आणण्यात आलंय.