INDIA Alliance press conference : ते उद्या RSS लाही नकली म्हणतील – उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
येत्या 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार सत्तेवर येईल आणि देशातलं 'जुमला' पर्व संपेल आणि 'अच्छे दिन'ची सुरुवात होईल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शनिवारी सकाळी इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
येत्या 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार सत्तेवर येईल आणि देशातलं ‘जुमला’ पर्व संपेल आणि ‘अच्छे दिन’ची सुरुवात होईल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शनिवारी सकाळी इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजप सरकारवर कडाडून हल्ला चढवला.
लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज संपणार असून सोमवारी मतदान होणार आहे. शुक्रवारी मविआची रॅली झाल्यानंतर आज , शनिवारी सकाळी मुंबईत इंडिया आघाडीची पत्रकार परिषद शनिवारी झाली. या संयुक्त पत्रकार परिषदेसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, रमेश चेन्नीथला, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, उद्धव ठाकरे , संजय राऊत आदी नेते उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थिती विषद केली. तसेच शिंदे सरकार, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडलं.
महाराष्ट्र लुटण्याचा डाव
केंद्र सरकारला मुंबई तोडायची आहे. महाराष्ट्राची लूट केली जात आहे, राज्याला बदनाम केलं जातंय. शासकीय यंत्रणांचा दुरूपयोग केला जातोय, असा आरोप त्यांनी केला. भाजपकडून भ्रष्टाचाऱ्यांचा सन्मान केला जातो अशी टीकाही त्यांनी केली. मोदी घटनाबाह्य सरकारला सोबत घेऊन हुकूमशाहीचा प्रचार करतायत. तोडा, फोडा आणि राज्य करा यावर भाजपचा भर आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.
संघालाही नकली म्हणतील
एका वृत्तपत्रात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नडडा यांची मुलाखत छापून आली आहे. त्या विधानाचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. उद्या ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नकली म्हणतील. मला तर आता वाटायला लागलंय की संघासाठी हे १०० वं वर्ष धोक्याचं आहे, भाजप संघावरही बंदी घालेल.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नडडा यांची एक मुलाखत समोर आली आहे. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत भाष्य केलं. ‘ सुरूवातीला वाजपेयींच्या काळात भारतीय जनता पक्ष हा कमी ताकदवान होता, तेव्हा पक्ष चालवण्यासाठी आम्हाला संघाची गरज होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता पक्ष मोठा झाला आहे, पक्ष चालवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत’ असं नड्डा म्हणाले.
इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषेदत उद्धव ठाकरे यांनी नड्डा यांच्या या विधानाचा संदर्भ दिला. उद्या ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नकली म्हणतील.आता संघालाही धोका आहे, असे ते म्हणाले. भाजप एककल्ली कारभार देशात सुरू ठेवेल. ही हुकूमशाहीची सुरूवात आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात आणि इतरत्र झालेल्या प्रचारसभांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नकली असा उल्लेख केला होता. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं होतं. त्यांच्या याच विधानाला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर देत टोला लगावला.