LokSabha Election 2024 : मन हेलावले…. उत्साहात मतदानासाठी निघाले, केंद्राजवळ येताच मृत्यू; अचानक असं काय घडलं?
राज्यात लोकसभेच्या 11 जागांसाठी मतदान सुरू आहे. रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात मतदान होत आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या 11 ही लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. मात्र, रायगडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात तिसऱ्या टप्प्यासाठी उत्साहात मतदान सुरू आहे. राज्यात तर उकाड्याने थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसापासून उकाडा प्रचंड वाढल्याने घराबाहेर निघणंही मुश्किल झालं आहे. त्यामुळे आज मतदानाच्या दिवशी मतदारांनी सकाळीच घरातून बाहेर पडत मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर भल्या मोठ्या रांगा दिसत आहेत. पुरुषांप्रमाणेच महिला आणि तरुणांचीही मतदानासाठी मोठी गर्दी दिसत आहे. मात्र, असं असतानाच महाडमध्ये अत्यंत दुर्देवी गोष्ट घडली आहे. मतदान करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचं मतदान केंद्राजवळच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रकाश चिनकटे असं या मृत मतदाराचं नाव आहे. चिनकटे हे महाड तालुक्यातील दाभेकर कोंड (किंजळोली बु) येथील रहिवासी आहे. ते दाभेकर कोंड येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सकाळीच घरातून बाहेर पडले होते. सकाळी 9 वाजता ते मतदान केंद्राकडे पायी निघाले होते. अत्यंत उत्साहात ते निघाले होते. त्यांच्यासोबत गावातील काही लोक होते. त्यांच्याशी गप्पा मारत मारतच चिनकटे निघाले होते. मतदान केंद्राच्या अगदी जवळ पोहोचलेही होते. पण मतदान केंद्र फक्त 100 मीटर अंतरावर असतानाच त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे ते जागीच कोसळले. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जागं करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयातही नेलं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. अचानक झालेल्या या धक्कादायक प्रकाराने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. आपला सोबती अचानक आपल्याला सोडून गेल्याच्या घटनेवर गावकऱ्यांचाही विश्वास बसेनासा झाला आहे.
मतदान केंद्राचं अनोखं नाव
दरम्यान, रायगड जिल्ह्यात जोरदार मतदान सुरू आहे. अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील कोलाड येथील एका मतदान केंद्राचं नाव अत्यंत वेगळं असल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सखी असं या मतदान केंद्राचं नाव आहे. सखी या मतदार केंद्रात सर्व कर्मचारी महिला आहेत. या ठिकाणी सखी मतदार केंद्र अशी भव्य रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे. आकर्षक अशा फुग्यांनी मतदार केंद्र सजवण्यात आलेलं आहे. तसेच या मतदार केंद्रात सकाळपासून महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात मतदान केलंय. सखी या मतदार केंद्राची पूर्ण रायगडमध्ये चर्चा होत आहे.
तटकरे विरुद्ध गीते
दरम्यान, रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाचे अनंत गीते असा सामना होत आहे. गीते आणि तटकरे दोन्ही मातब्बर नेते आहेत. दोघांनाही सामाजिक आणि राजकीय प्रश्नांची जाण आहे. दोघेही अभ्यासू आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. दोघांनीही संसद गाजवलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.