मला सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीने… संजय राऊतांचा खोचक टोला
बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई आहे. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन, पैशाच्या ताकदीवर तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला, हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. पण ते शक्य नाही, असे संजय राऊत यांनी खडसावलं.
या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्याने सुप्रियाताई सुळे जिंकतील याचा मला विश्वास आहे. मला सुनेत्रा पवार यांची दया येते. त्यांच्याबद्दल वाईट वाटतंय. त्यांच्या पतीराजांनी, अजित पवार यांनी त्यांचा, म्हणजे एका गृहिणीचा बळीचा बकरा बनवला आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली. सुप्रिया सुळे यांचं काम सगळ्यांना माहीत आहे. महाराष्ट्रातील भाजपचे अनेक विद्यमान खासदार आता पुन्हा लोकसभेत दिसणार नाही, भाजपचा पराभव निश्चित आहे, असे संजय राऊत यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना नमूद केले.
लोकभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज राज्यातील 11 जागांसह देशातील 93 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये बारामतीच्या लढतीकडे अटीतटीची लढत होत असून त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. येथे पवार कुटुंबातील मुलगी आणि सून, सुप्रिया सुळे वि. सुनेत्रा पवार अशी लढाई आहे. बारामती लोकसभा मतदारसंघावर पवार कुटुंबियांचं वर्चस्व आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीयानंतर पवार कुटुंबातही राजकीय मतभेद निर्माण झाले. सुप्रिया सुळेंविरोधात तगडा उमेदवार देण्याकरता अजित पवारांनी त्यांची पत्नी, सुनेत्रा पवारांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. यावरून संजय राऊतांनी टीका केली.
मोदींनी पेडर रोडला शाहांनी बोरिवलीत भाड्याने घरं घेतलं
मी अस ऐकलं आहे की नरेंद्र मोदी यांनी पेडर रोड आणि अमित शाह यांनी बोरिवली मध्ये भाड्याने घर घेतलंय. त्यांना इथेच रहायचं आहे ना, दुसरं काम काय आहे त्यांना ? असा सवाल विचारत संजय राऊत यांनी पंतप्रधानांना टोला हाणला. त्यांना मणिपूरला जायला वेळ नाही, काश्मीर खोऱ्यात जायला वेळ नाही असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रात सतत दौरे होत असून येत्या 12 आणि 17 तारखेला त्यांचा मुंबई दौरा आहे. त्याच मुद्यावरून टीका करताना संजय राऊत यांनी टोला लागवला. तुम्ही इथे कितीही खुंट्या ठोकल्यात तरी महाराष्ट्रात शिवसेनेचा पराभव तुम्हाला करता येणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला.
बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई
लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असून सगळे महत्त्वाचे मतदार संघ महत्त्वाचे नेते लढत आहेत. मोदी, शहा सगळे इथे भाषण करून गेले आहेत. या सर्व मतदारसंघात बारामतीत सर्वांचं लक्ष होतं. महाराष्ट्राची लढाई ही बारामतीत होते आहे की काय ? शरद पवारांचा पराभव करायचा काहीही करून हे मोदी शहा यांनी ठरवलं आहे. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई आहे. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन, पैशाच्या ताकदीवर तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला, हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. पण ते शक्य नाही असे म्हणत बारामती आम्ही (महाविकास आघाडी) जिंकूच असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने सुप्रियाताई सुळे जिंकतील, असेही ते म्हणाले.
१० वर्षं टोप्या लावल्या तेवढ्या पुरे, मोदींना टोला
नारायण राणे यांच्याबाबतीत पराभवाचा चौकार बसेल. आम्ही या आधी 3 वेळा त्यांचा पराभव केलाय. कोकणातही आणि मुंबईतही हरवलं. आता लोकसभेच्या मोठ्या मैदानात उतरले आहेत. या कुस्तीतसुद्ध त्यांना चीतपट केलं जाईल, विनायक राऊत हे पुन्हा लोकसभेत जातील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी येऊ देत किंवा अमित शहा, महाराष्ट्राची जनता आता त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. 10 वर्षं टोप्या लावल्या तेवढ्या पुरे, आता महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.