नरेंद्र मोदी हे कधीच बाळसाहेब ठाकरे यांचा अपमान करूच शकत नाहीत. पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा तोल ढासळला आहे. त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं पाहिजे , असं त्यांनी जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
लोकभा निवडणुकांचे तीन टप्पे पार पडले. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मतदान पार पडलं असून काही टप्प्यातील मतदान बाकी आहे. याचदरम्यान राजकीय वातावरण भलंतच तापलं असून आरोप -प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून केलेल्या एका वक्तव्याला उद्धव यांनी प्रत्युत्तर दिले.त्यांच्यावर टीका केली. मात्र त्यांची ही टीका देवेंद्र फडणवीस यांना रुचली नसून त्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
‘मोदीजी कधी बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करूच शकत नाहीत. त्यांनी वारंवार सांगितलयं की हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरिता आदर्शच आहेत. पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा तोल ढळला आहे. त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला आहे. त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की त्यांना तत्काळ मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं पाहिजे, ‘ अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
अनिल देशमुखांना सूचक इशारा
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याशी समझौता करण्यासाठी माणूस पाठवला होता, असा मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. “ते सर्व कपोलकल्पित गोष्टी बोलत आहेत. बरंच सत्य माझ्याजवळ आहे, योग्य वेळी मी ते बाहेर काढेन” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सनसनी पसरवायची आहे, मात्र ज्यावेळेस मी सत्य बाहेर काढेन, त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे याच्यावर जास्त काही मी बोलत नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.