मुंबई | 1 जानेवारी 2023 : नवीन वाहन कायद्यात दुरुस्ती करा, यासाठी देशभरातले ट्रकचालक आक्रमक झाले आहेत. ट्रक चालकांनी एखाद्या कायद्याला विरोध करणं ही गोष्ट तुम्हाला नवीन वाटली असेल. मात्र त्यामागे काय कारण आहे. केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधात अनेक ठिकाणचे ट्रकचालक रस्त्यावर उतरले आहेत. 3 दिवसीय संपाची घोषणा करत कायद्यात बदलाची मागणी त्यांनी केलीय. महाराष्ट्रासह अनेक राष्ट्रीय महामार्गांवर ट्रकचालक आणि त्यांच्या संघटनांनी आंदोलन केलं. काही संघटना 1 जानेवारी ते 3 तारखेपर्यंत संपावरही गेल्या आहेत. यासह नागपूर-वसई-अकोला-गोंदिया-अमरावती-मनमाडसह इतर काही ठिकाणीही आंदोलनं झाली आहेत. याआधी स्वतःची चूक असूनही एखादा ट्रकचालक वाहन किंवा व्यक्तीला धडक देऊन पळून गेला, तर त्याला ३ वर्षांची कैद होती. नव्या कायद्यात १० वर्ष कैद आणि ७ लाखांचा दंड केला गेलाय.
सरकार म्हणतंय की ट्रकचालकानं एखाद्याला धडक दिल्यास त्याला रुग्णालयात नेणं गरजेचं आहे, पण तो पळून जात असेल तर दंडात्मक कारवाई योग्यच ठरते. ट्रकचालक म्हणतायत की अनेकदा चूक नसतानाही आम्हाला पळून जावं लागतं, कारण अपघातानंतर जमलेला जमावाकडून मारहाणीची भीती असते. सरकार म्हणतं की ट्रक अपघातांची वाढती संख्या चिंताजनक आहे, म्हणून कठोर नियम बनवणं योग्य. चालक म्हणतायत की हेतू चांगला आहे, मात्र अपघातात चूक कुणाची हे शोधण्याची यंत्रणाच नाही, अनेक अपघातात कायम मोठ्या वाहनाची चूक धरली जाते.
माहितीनुसार, देशात या घडीला २८ लाखांहून जास्त ट्रक धावत आहेत. अंदाजे 80 लाख लोक ट्रकचालक म्हणून काम करतात. दूध-पालेभाज्या, फळं, शेतमाल, पेट्रोल-डिझेल- बांधकाम साहित्य, व्यावसायिकांच्या वस्तू, अशा व्यावसायिक वाहतुकीत सर्वाधिक वाटा ट्रकचालकांचा आहे. त्यामुळे नव्या कायद्यात अनेक त्रुटी असून त्या सुधाराव्यात अशी मागणी ट्रकचालकांची आहे. सरकारचं शिष्टमंडळ आणि ट्रकचालक संघटनांमध्ये १० जानेवारीला बैठक होणार आहे. त्यावेळी काय तोडगा निघतो का? हे पाहणं महत्वाचं असेल.
दरम्यान, पेट्रोल, डिझेल यांसारख्या इंधनांची वाहतूक ही मोठमोठ्या ट्रँकरच्या माध्यमातूनच होते. पण आता या इंधनांच्या टँकर चालकांनीदेखील या संपात सहभाग घेतला आहे. त्यामुळे इंधनाचा तुटवडा होण्याची भीती वर्तवली जात आहे. याच भीतीमुळे राज्यातील अनेक शहरांमधील पेट्रोल पंपांवर आता गर्दी व्हायला लागली आहे.
शिर्डीत पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. शहरात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाने इंधन वाहतुकदार आणि चालक संपावर गेले आहेत. संपामुळे वाहनधारकांना मोठा मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. शिर्डीसह अहमदनगर जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपावर इंधन संपलं आहे. नववर्षात धार्मिक आणि पर्यटनस्थळी जाणाऱ्यांना संपाचा फटका बसतोय. दळणवळण ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. अनेक पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी आणि गोंधळ बघायला मिळतोय. वाहनधारकांमध्ये मोठा असंतोष आहे.
सोलापुरातदेखील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. उद्यापासून पेट्रोल पंप बंद असल्याच्या चर्चेने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर रांगा केल्या आहेत. “उद्यापासून पेट्रोल पंप बंद असल्याची माहिती आमच्यासमोर आल्यामुळे आम्ही पेट्रोल भरण्यासाठी इथे आलो आहोत. नक्की पेट्रोल पंप कशासाठी बंद आहेत हे आम्हालाही माहिती नाही. मात्र सर्वच लोकांनी वाहनांच्या रांगा केल्या म्हणून आम्ही देखील पेट्रोल भरण्यासाठी आलो”, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांनी देत आहेत. पेट्रोल पंप कशासाठी बंद आहेत किंवा ते बंद आहेत की नाही याबाबत कोणालाच कल्पना नाही.
धाराशिव येथील पेट्रोल-डिझेल पंपावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. काही वाहनचालक बाटली, कॅन यात पेट्रोल-डिझेल साठा करुन ठेवत आहेत. वाहनांची टाकी फुल केली जात असून पंपावर एकच गोंधळ उडताना बघायला मिळतोय. याशिवाय सांगली, वसई, हिंगोली, परभणी या शहरांमध्ये पेट्रोलपंपांवर वाहनांची मोठी रांग बघायला मिळत आहे. मालेगाव पेट्रोल पंपावर तर तोबा गर्दी बघायला मिळत आहे. मालेगावातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल शिल्लक नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय.
टँकर, ट्रक चालक, आरटीओ अधिकारी,ऑइल कंपन्याचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांची मनमाडच्या पानेवाडी येथील बैठक निष्फळ ठरली आहे. अधिकाऱ्यांनी चालकांना संप मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र चालक संघटना संपावर ठाम आहे. केंद्र शासनाने केलेला कायदा अन्यायकारक असून तो मागे घेतल्या शिवाय संप सुरुचं ठेवणार, अशी भूमिका चालक संघटनांनी घेतली आहे.
धुळे शहरात पेट्रोल भरून घेण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे. ट्रक चालक-मालक संघटनेचा संप असल्यामुळे पेट्रोल मिळणार नाही या भीतीपोटी वाहनधारकांची पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे.
वसईत पेट्रोल पंपावर वाहनधारकांचा हंगामा बघायला मिळतोय. पेट्रोल मिळणार नसल्याच्या भीतीने वसईतील पेट्रोल पंपावर मोटारसायकल धारकांच्या एक किलोमीटर पर्यंत रांगा आहे. रात्री 9 वाजता पेट्रोल पंप बंद झाल्याने रांगेत असलेल्या वाहनधारकांनी एकच हंगामा करीत पेट्रोल पंप चालू करा, अशी घोषणाबाजी केली. “आम्ही 4 तासांपासून पेट्रोलच्या रांगेत उभे आहोत. आमच्या गाडीत पेट्रोल नाही, पंप चालू करा. आमच्यासोबत लाहान मुलं आहेत”, अशी मागणी वाहनधारकांनी केला आहे.
परळी येथील पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी गर्दी केलीय. इंधन पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारल्याने त्याचा परिणाम पेट्रोल पंपावर पाहायला मिळतोय. बहुतांश ठिकाणी पेट्रोल संपल्यानंतर पेट्रोल पंप बंद केले जात आहेत. यामुळे नागरिकांची सध्या तुफान गर्दी पेट्रोल पंपावर दिसून येत आहे.