MHADA Lottery 2022 : मुंबईत म्हाडाच्या 4 हजार घरांची लॉटरी; दिवाळीत सोडत होणार
दिवाळीत ही लॉटरी निघणार आहे. यामुळे दिवाळीच्या दीड-दोन महिन्यांआधी जाहिरात प्रसिद्ध करुन अर्ज मागवले जाणार आहेत. यानंतर अर्जांची छाननी करुन दिवाळीत प्रत्यक्षात सोडत काढण्यात येणार आहे. गोरेगाव, अॅन्टॉप हिल, विक्रोळीसह मुंबईत अनेक ठिकाणी म्हडाची ही घरं उपलब्ध होणार आहेत. या लॉटरीमध्ये अल्प आणि अत्यल्प गटातील घरांचा समावेश असणार आहे.
मुंबई : मुंबईत घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत लवकरच म्हाडाचं घरं सर्वसामान्यांकरीता विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. मुंबईत म्हाडाच्या तब्बल चार हजार घरांची लॉटरी(MHADA Lottery 2022) निघणार आहे. दिवाळीतच या लॉटरीची सोडत होणार आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. तब्बल तीन वर्षापासून मुंबईत म्हडाच्या घरांची लॉटरी निघाली नव्हती. यामुळे अनेक जण या लॉटरीच्या प्रतिक्षेत होते. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे.
दिवाळीत निघणार लॉटरी
कोरोना काळात दुसऱ्या लॉकडाऊननंतर म्हाडाने कोकण विभागाची लॉटरी जाहीर केली होती. ठाणे, विरार सह अनेक ठिकाणी ही लॉटरी काढण्यात आली होती. मात्र, कोरोना महामारीनंतर तब्बल तीन वर्ष झाले तरी म्हाडने मुंबई विभागाची लॉटरी जाहीर केली नव्हती. यामुळे ही लॉटरी कधी जाहीर होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर मुंबईत म्हडाली लॉटरी जाहीर होणार आहे. दिवाळीत मुंबईमध्ये सुमारे चार हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे.
म्हाडाकडून सोडतीची तयारी सुरु
म्हाडाकडून सोडतीची तयारी देखील सुरु झाली आहे. लवकरच म्हाडातर्फे या लॉटरीबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. मुंबईतल्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर गेले आहे. यामुळे मुंबई सारख्या शहरात आपलं हक्काचं घर असाव असं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हडाची लॉटरी मोठा आधार ठरते. म्हाडाच्या गृहप्रकल्प योजनेत अनेक सर्वसामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार झाले आहे. प्रायव्हेट बिल्डर पेक्षा म्हाडाने तयार केलेल्या घरांच्या किमंती या सर्वसमाना्यांना परवडणाऱ्या अशा असतात.
जितेंद्र आव्हाड यांनीही केली होती म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसंदर्भात घोषणा
तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसंदर्भात काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट करत दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल, असं सांगितलं होतं. यानंतर आता म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी दिवाळीत मुंबईतील अंदाजे चार हजार घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती दिली.
गोरेगाव, अॅन्टॉप हिल, विक्रोळी आदी ठिकाणी असणार म्हाडाची घरं
दिवाळीत ही लॉटरी निघणार आहे. यामुळे दिवाळीच्या दीड-दोन महिन्यांआधी जाहिरात प्रसिद्ध करुन अर्ज मागवले जाणार आहेत. यानंतर अर्जांची छाननी करुन दिवाळीत प्रत्यक्षात सोडत काढण्यात येणार आहे. गोरेगाव, अॅन्टॉप हिल, विक्रोळीसह मुंबईत अनेक ठिकाणी म्हडाची ही घरं उपलब्ध होणार आहेत. या लॉटरीमध्ये अल्प आणि अत्यल्प गटातील घरांचा समावेश असणार आहे. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील घरांचा सोडतीत समावेश करू नये, असा निर्णय म्हाडानं घेतला होता. त्यानुसार चालू प्रकल्पातील म्हणजेच येत्या सहा महिन्यांत किंवा वर्षभरात बांधकाम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळू शकेल, अशा घरांचाच या सोडतीत समावेश केला जाणार आहे. यामुळे लॉटरी जाहीर झाल्यानंतर घरांचा ताबा मिळवण्यासाठी जास्त प्रतिक्षा करावी लागणार नाही.