विदर्भ आणि मराठवाड्यात भूकंपाचे धक्के, घरांनाही तडे, लोक रस्त्यावर
यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार 8-10 सेकंदासाठी धक्के जाणवले, ज्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले आहेत.
नांदेड : विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. नांदेड, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे काही घरांना तडे गेले आहेत, ज्यामुळे नागरिक रस्त्यावर आले आहेत. यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार 8-10 सेकंदासाठी धक्के जाणवले, ज्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले आहेत. नांदेडमध्ये 3.9 रिश्टर स्केल भूकंप नोंदवण्यात आला.
कुठे-कुठे भूकंपाचे धक्के?
नांदेड – जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुक्यातील विविध गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही.
यवतमाळ – जिल्ह्यातील महागाव, फुलसावंगी, उमरखेड, भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. काही घरांनाही तडे गेले. यानंतर तहसीलदार गावांमध्ये दौऱ्यासाठी रवाना झाले.
पर्यावरण तज्ञांचं म्हणणं काय?
पर्यावरणतज्ञांच्या मते भूगर्भातील हालचालींमुळे हे धक्के जाणवतात. शिवाय मानवाची निसर्गातील ढवळाढवळही याला कारणीभूत आहे. राजेंद्र फातरपेकर यांच्या मते, “महाराष्ट्राचा बराच भाग भूकंप प्रवण क्षेत्रात आहे. जैतापूरचा प्रकल्पही त्याच रेषेवर आहे. भूकंप प्रवण रेषेवर हा प्रकल्प आहे. या अवस्थेत भूकंपाचे धक्के कधीही जाणवू शकतात. अणू प्रकल्प तिथे लादणे धोकादायक आहे. ही भूगर्भातील घटना असली तरी आपण निसर्गामध्ये ढवळाढवळ करत असल्यामुळे हा प्रकार होत आहे. धक्के कधीही जाणवू शकतात.”
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती काय?
यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध गावांमध्ये आठ ते दहा सेकंदासाठी धक्के जाणवल्याचं सांगण्यात आलं होतं. याची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले. अजून कोणत्याही नुकसानीची माहिती नाही. लातूर आणि अमरावतीमधून या भूकंपाची तीव्रता किती होती याची माहिती मिळेल.
पाहा व्हिडीओ :