मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा नावाच्या एका तरुणीने बलात्काराची तक्रार केल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला जात आहे. तर महाविकास आघाडीकडून मुंडेंच्या बाजूने सावध भूमिका घेतली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (14 जानेवारी) हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत पक्षातील इतर सहकाऱ्यांशी चर्चा करुन पक्ष म्हणून निर्णय घेऊ, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे मुंडे यांचं मंत्रिपद धोक्यात आहे की काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीनंतर मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका पवार यांनी मांडली (Maha Vikas Aghadi leaders on Dhananjay Munde case).
धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांच्यावर भाजप नेते कृष्णा हेगडे, मनसे नेते मनीष धुरी यांनी गंभीर आरोप केले. या दोन्ही नेत्यांनी रेणू शर्मा यांच्याकडून आपल्या हनिट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप दोन्ही नेत्यांनी केला आहे. या आरोपांनंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेत्यांची मुंडे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज (15 डिसेंबर) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत हे खरे आहे. मात्र, ही महिला ब्लॅकमेलिंग करत असल्याची बाब समोर आली असल्याची चर्चा या बैठकीत झाली. त्यामुळे सध्यातरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असा निर्णय पक्षाने घेतला आहे. या बैठकीनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडली (Maha Vikas Aghadi leaders on Dhananjay Munde case).
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
“राजीनामाचा विचार करण्याची गरज आहे की नाही यात मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्याबाबत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाहीतर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे त्याची सत्यता पुढे यावी. मग आम्ही निर्णय घेऊ. त्यामुळे सध्या आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाहीत. सत्य समोर आल्यावर निर्णय घेऊ”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्याआधी भाजपने आधी स्वत:कडे बघावं : सुनील केदार
काँग्रेस नेते आणि पशू संवर्धन मंत्री सुनील केदार यांनीदेखील या प्रकरणी आपली भूमिका मांडली. “धनजंय मुंडे यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्यावर चौकशी सुरु आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना भाजपने स्वत:कडे बघावं. भाजप आमदार राम कदम यांनी केलेलं वक्तव्यही त्यांनी बघावं,” असा टोला सुनील केदार यांनी भाजपला लगावला. तसेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत पोलीस चौकशी सुरु असल्याचं म्हटलं.
महिलेला ब्लॅकमेलिंग करण्याची सवय असल्याचे प्रतिबिंबित होतेय : जयंत पाटील
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीदेखील धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. “ज्या महिलने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्या महिलेवर इतर दोन नेत्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले आहेत. त्यावरुन या महिलेला ब्लॅकमेलिंग करण्याची सवय असल्याचे प्रतिबिंबित होत आहे. भाजपच्या एका माजी आमदाराने त्याविषयी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी. सत्य बाहेर आल्यानंतर आम्ही कारवाई करु,” अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.
‘माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता’, रोहित पवारांकडूनही पाठराखण
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनीदेखील याप्रकरणी मुंडेंची बाजू घेतली आहे. माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता, असं ते स्पष्टपणे म्हणाले आहेत. “गायिका रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांबद्दल पोलीस तपास करत आहेत. तपास होईपर्यंत काही बोलता येणार नाही. मात्र, काही प्रमाणात हा बदनामीचा आणि ब्लॅकमेलींगचा प्रकार असल्याचे पुढे येतय.शेवटी पोलीस तपासात सर्व गोष्टी पुढे आल्यानंतर याबद्दल पक्ष आणि स्वत: धनंजय मुंडे याबद्दल निर्णय घेतील. धनंजय मुंडे यांनी स्वत: याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सत्य परिस्थिती त्यांनी लोकांसमोर मांडली. माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता, अशा व्यक्तीविरोधात षडयंत्र होत असेल तर त्याबद्दल खोलात जाण्याची गरज आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, चौकशी करुन कारवाई करु’, अनिल देशमुखांची तटस्थ भूमिका
धनंजय मुंडे बलात्कार आरोप प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “कायदा कुणावरही भेदभाव करणार नाही. या प्रकरणावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. कायद्यापुढे मंत्री मोठा नाही आणि संत्रीही नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. चौकशीतून जे काही पुढे येईल त्यानुसार कारवाई करण्याती येईल,” अशी तटस्थ भूमिका त्यांनी मांडली.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेऊ नये : संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेऊ नये, अशी भूमिका मांडली. “कालपासून धनंजय मुंडे प्रकरणाला जी कलाटणी मिळाली आहे, तक्रारदार व्यक्तीबाबतही अनेक तक्रारदार आहे. त्यामुळे तक्रारदार व्यक्तीबाबतचे प्रकरणही गंभीर आणि धक्कादायक वाटायला लागलं आहे. ही एकच प्रवृत्ती नाही तर अशा अनेक प्रवृत्त्या आहेत ज्या कायद्याचा दुरुपयोग करत आहेत”, असं राऊत म्हणाले.
ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर
“हनिट्रॅप महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हता. पण अलिकडे ज्याप्रकारचं राजकारण गेल्या वर्षभरात चाललं आहे, चिकलफेक आणि बदनाम करण्याचं, त्यामध्ये वाढ झाली आहे. यात फक्त व्यक्तीची बदनामी नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची बदनामी होतेय, असं मला वाटतंय. म्हणून या सर्व विषया प्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेऊ नये, या मताचा मी सुद्धा आहे. सकाळीच शरद पवारांना आम्ही भेटलो. सर्वांचीच ती भावना आहे. त्या भावनेचा आदर पवारांनी केला आहे”, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, शरद पवारांची आजही रोखठोक भूमिका